भडगावला भाजपतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी
साईमत।भडगाव।प्रतिनिधी।
शहरात दोन – तीन दिवसांपूर्वी उबाठा शिवसेनेच्या नेत्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांनी त्यांच्या प्रचारार्थ वैयक्तिक मजकूर व आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेले पोस्टर भडगाव शहरासह विधानसभा क्षेत्रात गल्लीबोळात लावली आहेत. ते लावत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारची दक्षता न घेता, गटारींवर असलेल्या भिंतीवर, मुतारीच्या भिंतीवर, अडगळीत पडलेल्या भिंतीवर व दुकानांच्या शटरवर ही पोस्टर लावण्यात आली. काही ठिकाणी समाजकंटकांनी शिवाजी महाराजांच्या फोटोची विटंबना केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना काही नागरिकांनी सूचनाही केल्या होत्या. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेता अशा गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले.हा प्रकार तीन दिवसांपूर्वी जेव्हा पूर्ण शहरात समजला, तेव्हा शहरातील तरुण मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनला जमा झाले होते. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.
परंतु या प्रकरणात पोस्टर प्रकाशक व पोस्टर लावणारे हेही तेवढेच गुन्हेगार आहेत. कारण की, मुतारीवर व गटारीवर महाराजांची प्रतिमा असलेले पोस्टर लावणे म्हणजे एक प्रकारे विटंबनाच आहे. तसेच शटरवर लावलेले पोस्टरही शटर उघडल्यावर फाटणार आहे, असे माहित असूनही ते पोस्टर लावणे म्हणजेच महाराजांच्या प्रतिमेची एकप्रकारे विटंबनाच आहे. म्हणून महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या सर्व घटकांवर गुन्हा दाखल व्हावा, अन्यथा भारतीय जनता पार्टी भडगाव तालुका म्हणून तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनानंतर होणाऱ्या परिणामास प्रशासक म्हणून आपण सर्वस्वी जबाबदार रहाल, असे भाजपातर्फे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
निवेदनावर भाजपाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, भाजयुमो विधानसभा संयोजक किरण शिंपी, भडगावचे शहराध्यक्ष धर्मेंद्र परदेशी, शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजयुमोचे शहराध्यक्ष विशाल चौधरी यांची स्वाक्षरी आहे. निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक जळगाव यांना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.