नववी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
येथील श्री महालक्ष्मी देवी चॅरिटेबल ट्रस्टची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील होते. सभेत संस्थेचे सचिव डी .डी. पाटील यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. ते सर्वानुमते मंजूर केले. आगामी वर्षभरात ट्रस्टतर्फे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्या संदर्भातही ठराव सचिव यांनी सभेसमोर ठराव मांडले. ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष शंकर बाबुराव मराठे यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी वैशाली विलास चौधरी यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे संस्थेचे ज्येष्ठ संचालक नारायण देवचंद महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने त्यांच्या जागी रूपाली जितेंद्र गोरे यांना संचालक म्हणून घेण्यात आले. यासोबतच शकुंतला कडूबा पाटील आणि ॲड.राजेंद्र पुंडलिक चोपडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली.
ट्रस्टचे पदसिद्ध विश्वस्त म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन, माजी नगराध्यक्ष साधना महाजन, तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्याधिकारी नितीन बागुल यांना घेण्यात आले आहे. ट्रस्टतर्फे महालक्ष्मी देवी मंदिरासाठी नगरपालिकेकडून जागा मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच जागा मिळवून कोल्हापूरसारखे महालक्ष्मी देवीचे भव्य मंदिर जामनेर शहरात उभे राहील. त्यानंतर ना.महाजन यांच्या हस्ते भुमीपूजन समारंभ करण्यात येईल, असा विश्वास संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा वैशाली चौधरी यांनी व्यक्त केला. संस्थेच्या सचिव डी.डी.पाटील यांनी आभार मानले.