आनंदयात्री परिवाराच्या स्तुत्य उपक्रमाचे होतेय कौतुक
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प.मराठी शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून जामनेर येथील आनंदयात्री परिवारातर्फे शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व १९८ विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी आनंदयात्री परिवाराचे अध्यक्ष डॉ. अमोल सेठ होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश सोनवणे, डॉ. आशिष महाजन, कडू माळी, मुख्याध्यापक पी.टी.पाटील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आनंदयात्री परिवारातर्फे शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षकांचा शाल, गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक पी.टी.पाटील, डॉ. अमोल सेठ यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी आनंदयात्री परिवाराच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाला हरिदास उघडे, सुधाकर गोसावी, नाना सुरळकर यांच्यासह पालक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शाळेतील उपशिक्षक कैलास महाजन, रामेश्वर आहेर, जयश्री पाटील, छाया पारधे, निर्मला महाजन यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जयंत शेळके तर आभार नाना धनगर यांनी मानले.