बारी समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात
साईमत/चोपडा/प्रतिनिधी :
झपाट्याने बदलणाऱ्या काळात आताच्या तरुण पालकांनीच आता आपल्या मुलांसाठी रोल मॉडेल बनावे. स्वतःच्या प्रत्यक्ष कृतीतून मुलांवर चांगले संस्कार रुजवावे. मुलांसाठी स्वतः वाचनाची सवय लावावी, मुलांसमोर मोबाईल कमी वापरावा, मुलांना आपल्या वस्तू, भावना वाटण्याची सवय लावावी. साध्या राहणीचा अंगिकार करावा, असा सल्ला उपस्थित पालकांना देत नाशिक येथील शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानदेव नाठे (बारी) यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. ते चोपडा येथील बारीवाडा येथे समस्त सुर्यवंशीय बारी समाज पंच मंडळ, बारी समाज महिला मंडळ व नागवेल मित्र मंडळातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलत होते.
यावेळी मंचावर शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, बारी पंच मंडळाचे अध्यक्ष किरण बारी, सचिव देवेंद्र बारी, महिला मंडळाच्या अध्यक्षा पूजा बारी, उपाध्यक्षा विद्या बारी, नागवेल मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल बारी, उपाध्यक्ष योगेश बारी, निवृत्त नायब तहसिलदार गणेश बारी, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश बारी, ज्येष्ठ नागरिक मोहन बारी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बारी समाजातील इ. १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित रंगभरण, सुंदर हस्ताक्षर, सामान्य ज्ञान, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना विविध पारितोषिके, प्रमाणपत्र, शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी मनोगत व्यक्त करतांना आपल्या अंतरंगातील गुणांवर लक्ष केंद्रित करत आयुष्यात मोठे यश गाठावे, असे सांगत गुणवंत विद्यार्थ्यांचे व आयोजकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी अजय बारी, पराग बारी, ऋषिकेश कोथळकर, कुणाल बारी, भूषण बारी, शिवदास बारी, भगवान बारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी समाजबांधव, महिला उपस्थित होते. सूत्रसंचालन तथा आभार संजय बारी यांनी मानले.