जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील चार गावांना नुकसान, सतर्कता बाळगण्याचे आवाहन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गेल्या दोन दिवसांत झालेल्या वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अजिंठा पर्वतरांगातून संततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला आहे. त्यामुळे जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील चार गावांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेले आहे. बाधित गावांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच मदतकार्याची गती वाढविण्याबाबत सूचना केल्या.
वाघूर नदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पुराच्या पाण्याने जीवितहानी वा पशुधनाची हानी झालेली नाही. मात्र वित्तहानी झालेली आहे. बाधित गावांत आवश्यक ती मदत करण्यासाठी जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे हे घटनास्थळी उपस्थित आहे. नागरिकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे. मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथकही (एसडीआरएफ) मागविण्यात आलेले आहे. त्यांच्याद्वारे आवश्यक मदतकार्य करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा आदी ठिकाणीही मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक नियुक्त केले आहे.
नागरिकांनी तापी, वाघूर नदीपात्र परिसरात जाऊ नये
तापी व वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे हतनूर, वाघूर धरणातील पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.आवश्यकतेनुसार विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नागरिकांनी तापी, वाघूर नदीपात्र परिसरात जाऊ नये. तसेच पशुधन ही नेऊ नये. आपातकालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्र. ०२५७ -२२१७१९३ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
मंत्री गिरीष महाजन यांच्या सूचनेनुसार वाघूर नदी काठावरील प्रभावित गावांची पाहणी
जामनेर: ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या सूचनेनुसार जामनेर तालुक्यासह परिसरात झालेल्या पावसामुळे वाघूर नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. त्याच्या पाहणीसाठी पथक रवाना झाले आहे. त्यात सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण, तहसीलदार नानासाहेब आगळे, सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक पालवे, चंद्रकांत बाविस्कर, पहूर कसबेचे उपसरपंच राजू जाधव, पहूर पेठचे सरपंच अबू तडवी, वासुदेव घोंगडे, राजधर पांढरे, ईश्वर बारी, रमेश पांढरे यांच्यासह इतर सहकारी अधिकारी पाहणी करीत आहे. घरात शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना आधार देऊन त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना तसेच त्यांना आधार देण्याचे काम याठिकाणी सुरू केले आहे. पहूरपेठ, हिवरी दिगर आणि इतर गावांना पाहणीसह भेटी देण्याचे काम सुरू आहे. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन हे जामनेरमध्ये नसल्याने त्यांनी पाहणीच्या व योग्य त्या मदतीच्या सूचना दिल्या आहे. ते जामनेरात आल्यानंतर लागलीच नदी काठावरील भागाला भेट देणार असल्याचे संबंधितांनी सांगितले.
पहुरला आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल
पहुर,ता.जामनेर/प्रतिनिधी : पूर परिस्थिती आटोक्यात आली असली तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पहुरला आपत्ती व्यवस्थापन पदकास पाचारण केले आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन सज्ज झाले आहे.
संरक्षण भिंत नसल्याने घुसले गावात पाणी
जामनेर तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे संरक्षण भिंत नसल्याने वाघूर नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन संरक्षण भिंत उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.