चोपडा तालुका रा.काँ. (एसपी गट) तर्फे अनोखे ‘रास्ता रोको’ आंदोलन
साईमत/चोपडा/प्रतिनिधी :
तालुक्यातून जाणारा बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर अशा आंतरराज्य महामार्गाची परिस्थिती बरीच खराब झाली आहे. त्यावरील पडलेल्या खड्डयांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. त्यावरून प्रचंड वाहतूक असल्याने प्रवाशांसह वाहनधारकांची हाड खिळखिळी होत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती पावरा सध्या तालुक्यात जनसंपर्क दौरा करत आहे. त्यामुळे त्यांच्या ही समस्या लक्षात आल्याने त्यांनी ‘खिचडी’ आंदोलन करून ‘रास्ता रोको’ ही संकल्पना पक्षातील वरिष्ठांकडे मांडली. त्याला तात्काळ वरिष्ठांनी मान्यता दिल्याने संकल्पनेतून तालुक्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रा.काँ. (एसपी)च्या गटाने वर्डी ते माचला फाटा अंतर्गत एक छोट्याशा पुलावर पडलेल्या रस्त्यावरील मोठ्या जीवघेण्या खड्डयात “चुल तयार करुन खिचडी शिजवून” हे अनोखे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांकडून तहसील कार्यालयाचे उपस्थित प्रतिनिधी यांना आंदोलनाचा उद्देश काय आहे, त्याची कल्पना देऊन त्रस्त नागरिकांच्या भावना झोपलेल्या शासनाला कळवाव्यात आणि रस्त्याचे काम लवकर मार्गी लागावे, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
तालुक्यातून जाणारा बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर अशा आंतरराज्य महामार्गाची परिस्थिती बरीच खराब झाली आहे. त्यामुळे वाहने नादुरुस्त होत असून पाच ते दहा अपघात तर नित्याचेच ठरलेले आहेत. राष्ट्रीय व राज्य अशा दोन्हींचे सार्वजनिक बांधकाम खाते गच्च डोळे लावूनन बसलेले आहेत. रस्त्यावरील जीवघेण्या खड्डयांमुळे किती जणांचा बळी जाण्याची वाट ही दोन्ही खाती पाहत आहे? याबाबतीत रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचा शेतकऱ्यांचा, रुग्णवाहिकेतून नेल्या जाणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांचा, गरोदर महिलांचा, शासनाने महिलांना बस प्रवासासाठी तिकिटातून ५० टक्के सूट दिल्याने महिला प्रवाश्यांची वाढलेली संख्येने प्रवासात त्यांना ७५ वर्षावरील मोफत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांना खराब रस्त्यामुळे तीव्र संताप होत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.
यांचा होता आंदोलनात सहभाग
आंदोलनात तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, माजी सभापती विनायकराव चव्हाण, डी.पी.साळुंखे, साखर कारखाना मा. चेअरमन अतुल ठाकरे, तुकाराम पाटील, लहूश धनगर, भरत पाटील, डॉ कांतीलाल पाटील, राकेश पाटील, मयूर पाटील, रामचंद्र बारेला, रज्जाक तडवी, शेखर पाटील, सचिन धनगर, रामचंद्र बारेला, नामा बारेला, गोपाल पाटील, समाधान कुंभार, सुरेश पाटील, खैरनार, युवराज पाटील, बंटी नायदे, बाळू पाटील तसेच पंचक्रोशीतील असंख्य लहान-मोठे वाहनधारक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते, सहकारी, शेतकरी, विद्यार्थी, पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी रस्त्याच्या आंदोलनात सहभागी होऊन शिजलेली खिचडी सेवन करून आंदोलनाला पूर्णविराम देण्यात आला.