>> ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे प्रमुख आंदोलनकर्त्यांना आश्वासन
साईमत/मुंबई/प्रतिनिधी :
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्यावतीने सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक आणि ग्रामपंचायत कर्मचारी अशा घटकांनी संयुक्तरित्या उभारलेल्या धरणे आंदोलनप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी गावागाडा चालविणाऱ्या सर्व घटकांच्या प्रलंबित मागण्या आमच्या सरकारच्यावतीने लवकरच पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे जाहीर केले. तसेच सरपंचांसह ग्रा.पं. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्णतेसाठी कटीबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनीही आंदोलकांना सामोरे जाऊन मागण्या समजून घेतल्या.
अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक-प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वात बुधवारी, २८ रोजी मंत्रालयावर मोर्चा म्हणून मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र जमून सरपंच व ग्रामपंचायतीच्या सर्व घटकांनी मिळून एक दिवसीय धरणे आंदोलन केले. आंदोलनास राज्यभरातून उपस्थिती आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला.