योगासह फिटनेस संदर्भात मार्गदर्शन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्राचा गुरुवारी, २९ ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला. प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी कु.व्ही. केजो, माजी आमदार मधु जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी टेबल टेनिस खेळून केंद्राचा प्रारंभ केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तलवेलकर, फारूक शेख, असोसिएशनचे सचिव विवेक आळवणी, राजेश जाधव, इकबाल मिर्झा आदी उपस्थित होते.
असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, सहसचिव सुनील महाजन ह्यांनी केंद्राला शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षक आकाश कासार हे सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ६ ते ८ या वेळेत बेसिक, इंटर्मिजीएंट व ॲडव्हान्स ट्रेनिंग देण्यार आहे. त्याचबरोबर योगा आणि फिटनेस संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षक आकाश कासार खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत. खेळाडूंनी ह्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे केले आहे. सूत्रसंचलन सहसचिव राजु खेडकर यांनी केले.