घटनेनंतर ट्रक चालक पसार, घटनास्थळी जमला मोठा जमाव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी:
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरु असतांना बुधवारी, २८ ऑगस्ट रोजी शहरातून पाळधीकडे जाणाऱ्या महामार्गानजीकच्या मानराज पार्क ते गुजराल पेट्रोलपंपादरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवरील दोन महिला जागीच ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. भीषण अपघातात एक वर्षांचा चिमुरडा मुलगा जखमी झाला आहे. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे. घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले होते. दरम्यान, घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला आहे.
सविस्तर असे की, शहरातील खोटेनगर परिसरातून मानराज पार्ककडे येणाऱ्या उड्डाणपुलाच्या उतरतीवरून दोन्ही महिला ह्या एक वर्षाच्या मुलाला सोबत घेवून दुचाकी (क्र. एमएच १८ एएस ५३७९ ) ने जात असतांना त्यावेळी दुचाकीच्या मागे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही महिला जागीच ठार झाल्या तर सोबत असलेला चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. दोघांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. त्यांची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. अपघात घडल्यानंतर पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील, हेमंत निकम, दीपक राव यांनी सहकार्य केले.