प्राध्यापक प्रबोधिनीच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.तेजस राणे यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी:
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीत अनेक गोष्टींमुळे शरीरावर परिणाम होत आहे. अनेक व्यक्तींना नानाविध व्याधी जडत आहे. त्यामुळे अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत उत्तम निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार अत्यावश्यक आहे. दैनंदिन आहार योग्य प्रमाणात, योग्यवेळी घेतला पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी रोज विशिष्ट प्रमाणात कॉर्बोहायड्रेड्सचे सेवन झालेच पाहिजे. सायंकाळचे जेवण साधारणतः रात्री आठ वाजेच्या आत घेणे उत्तम. तसेच जेवणानंतर किमान १-२ तासानंतर शतपावली करावी. लागलीच फिरायला गेलात तर अपचनाचा त्रास होतो. सकाळी उठल्यावर ग्लासभर गरम पाणी सेवन केले पाहिजे. सर्वात उत्तम प्रोटीन्स अंड्यातून मिळत असल्याने रोज किमान एक उकडलेले अंडे आहारात असावे, असा मौलिक सल्ला डॉ.तेजस दिलीप राणे (एम.डी.मेडीसन) यांनी दिला.
येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. विशेष म्हणजे ते स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपप्राचार्य प्रा.करुणा सपकाळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,स्वामी विवेकानंदांची सुबक, आकर्षक मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षकांच्या अनेक आरोग्यविषयक प्रश्नांना त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे, दोन्ही समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, प्रा. उमेश पाटील, प्राध्यापक प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा.उमेश ठाकरे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी प्रा.राजेश साळुंखे, प्रा.अर्जुन मेटे, प्रा.लीना भारंबे, डॉ. श्रद्धा पाटील, प्रा.मीनल पाटील, प्रा.एकता कवटे, प्रा.माधुरी पाटील यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.शीतल काळे तर आभार प्रा.चारुलता बेंडाळे यांनी मानले.