डॉ. राजेश मानवतकर यांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :
शेतात कोळपणीचे काम सुरू असतांना गवताच्या झुडपात दडून बसलेल्या घोणस जातीच्या विषारी सर्पाने शेतकऱ्याच्या पायास चावा घेतला. ही बाब लक्षात येताच शेतकऱ्याने यावल येथील ग्रामीण रुग्णालय गाठले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाईकांनी त्यांना घेवून जळगाव गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, भुसावळच्या तापीनदी पुलावर त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना तातडीने भुसावळातील डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन शेतकऱ्याला ‘जीवदान’ मिळाले आहे. सात दिवसाच्या उपचारानंतर शेतकरी समाधान वाघ यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने डॉ. मानवतकर यांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे ‘जीवदान’ मिळाल्याने वाघ परिवारात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर असे की, यावल येथील शेतकरी समाधान वसंत वाघ (वय ४२) हे नेहमीप्रमाणे यावलपासून दोन किलोमीटर अंतरावरील शेतात एका सहकाऱ्यासह पीक कोळपणीच्या कामासाठी गेले होते. मात्र, सकाळी ९ वाजेच्या दरम्यान कोळपणीचे काम सुरू असतांना गवताच्या झुडपात दडुन बसलेल्या तीन ते साडेतीन फुट लांबीच्या घोणस जातीच्या विषारी सर्पाने त्यांच्या डाव्या पायास चावा घेतला. ही बाब लक्षात येताच समाधान वाघ यांनी सहकाऱ्याच्या मदतीने एक किलोमीटर अंतरावरील यावल ग्रामीण रुग्णालय गाठले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना सर्पदंश झाल्याची माहिती देण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली होती. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कुटुंबियांनी समाधान वाघ यांना भुसावळमार्गे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना भुसावळ नजिकच्या तापीनदी पुलावर त्यांची प्रकृती चिंताजनक होवून त्यांचा श्वास बंद पडला होता. त्यामुळे भांबावलेल्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने भुसावळातील डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वाघ यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू केले होते.
असंख्य रुग्णांना दिले ‘जीवदान’
रुग्णाला अत्यंत विषारी सर्पाने दंश केल्याने रुग्णाचा श्वास बंद पडला होता. ही गंभीर परिस्थिती पाहून रुग्णाचा श्वास सुरू करण्यासाठी ऑक्सिजन, व्हेंटीलेटर व औषधोपचाराने रक्तात पसरलेल्या विषाचा प्रभाव करण्यासाठी एएसव्ही इंजेक्शनचा वापर करण्यात आला. अतिशय गंभीर अशा परिस्थितीतून रुग्णाला ‘जीवदान’ देण्यास यश आले. आतापर्यंत सर्पदंश झालेल्या असंख्य रुग्णांवर उपचार केल्याने त्यांना ‘जीवदान’ मिळाले आहे.
-डॉ. राजेश मानवतकर, भुसावळ