सुरक्षाबाबत दक्षतेची गरज, जि.प.शाळांमध्ये कॅमेरे नाहीत
साईमत/धानोरा, ता. चोपडा/प्रतिनिधी :
सध्या महाराष्ट्रात बाललैंगिक शिक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक संस्था पुढे आलेल्या आहेत.बदलापूर व अन्य ठिकाणी शाळेतील मुलींवर अन्याय अत्याचार होऊन शोषण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत सक्रिय कॅमेरे असले पाहिजेत.तसेच मुलींच्या सुरक्षेबाबत राज्य शासनाने नुकतेच महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केलेले आहेत. चोपडा तालुक्यातील धानोरा येथे सहा शाळा आहेत. त्यात तब्बल २५०० च्यावर विद्यार्थी अध्ययन करत आहेत. त्यात दोन जि.प.शाळा वगळता अन्य शाळांमध्ये कॅमेरे बसविलेले आहेत. लहान मुलांसाठी कॅमेरे अत्यावश्यक आहेत, असा सर्वत्र सूर उमटत आहे. सर्वाधिक कॅमेरे धानोरा आश्रमशाळेत आहेत तर धानोरा जिल्हा परिषद तसेच बिडगाव, कुंड्यापाणी, बढाई, मोहरद येथील शिक्षक शाळा सुटण्याच्या अगोदरच धानोरा बसस्थानक येथे दिसत असतात. कॅमेरे लावल्यानंतर हे चित्रही स्पष्ट होईल.
चोपडा तालुक्यातील धानोरा गाव बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर वसलेले आहे. येथून दररोज तब्बल हजारावर मुले-मुली शिक्षणासाठी जळगाव, चोपडा, यावल, फैजपूर, शिरपूर अन्य ठिकाणी ये-जा करत असतात. गावात व बसस्थानक परिसरात सकाळपासूनच विद्यार्थ्यांची रेलचेल असते. त्यामुळे लहानपासून ते मोठ्या मुला-मुलींची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी बसस्थानक परिसरात चांगल्या दर्जाचे कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. सध्या गावात ग्रामपंचायतने कॅमेरे बसविलेले आहेत.
अशी आहे विद्यार्थ्यांसह कॅमेऱ्यांची संख्या
धानोऱ्यातील झि.तो.महाजन विद्यालयात ९०० विद्यार्थी संख्या असून नऊ कॅमेरे आहेत. आश्रमशाळेत ८२७ विद्यार्थी संख्या असून २४ कॅमेरे आहेत. अजून चांगल्या दर्ज्याच्या सुरक्षेबाबत काळजी घेतली जाणार आहे. मिशन शाळेत ३६० विद्यार्थी संख्या असून सहा कॅमेरे आहेत. जि.प.मराठी शाळेत ३०१ विद्यार्थी संख्या असून कॅमेरे नाहीत. उर्दू शाळेत ११३ विद्यार्थी संख्या असून कॅमेरे नाहीत. पोदार जंबो कीड्समध्ये विद्यार्थी संख्या ६३ असून नऊ कॅमेरे आहेत. बसमध्येही कॅमेरे बसविलेले आहेत.
जिल्हा परिषद शाळेतही सर्वच मुलांसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. त्यावर स्थानिक पातळीवरून कार्यवाई झाली पाहिजे. शाळेत सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे.
– योगेश्वरी सोनवणे
चोपडा महिला तालुकाध्यक्ष, मानवाधिकार संघटना
सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. याबाबत लवकरच पालकांशी चर्चा करुन ठोस पावले उचलले जातील.
-प्रदीप महाजन, चेअरमन, धानोरा विद्यालय