पाहणीत ३५ पैकी दहा पाणी साठ्यात आढळली ‘लारव्हा’ अळी
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी:
तालुक्यातील कवली येथील डेंग्यूसदृश तापाने महिलेच्या मृत्यू प्रकरणी शुक्रवारी आरोग्य सहायक संचालक पथकाने भेट दिली. पथकांने गावातील साठवण केलेल्या पाणी साठ्यांची पाहणी करून कीटक शास्त्रीय सर्वेक्षण केले. त्यामध्ये घरात साठवण केलेल्या कंटेनरमधील पाणी साठ्यांची पाहणी केल्यावर ३५ पैकी दहा पाणी साठ्यात ‘लारव्हा’ अळी आढळून आली आहे. त्यामुळे गावात डेंग्यूसदृश तापाने शिरकाव केल्याच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना सहाय्यक संचालक पथकातील कीटक समहारक अनिल शेजवळ यांनी तालुका आरोग्य विभागाला दिल्या आहे.
तालुक्यातील कवली गावात शुक्रवारी पुन्हा तीन रक्त नमुने तपासणीसाठी घेतले आहे. यावेळी पथकातील अनिल शेजवळ, विजय जक्कल, आरोग्य निरीक्षक ज्ञानेश्वर अलोने यांनी गावातील ३५ पाण्याचे साठे तपासले. त्यापैकी दहा पाणी साठे दुषित आढळून त्यामध्ये ‘लारव्हा’ अळी आढळून आली आहे. ‘लारव्हा’ अळीचा नायनाट करण्यासाठी पाण्यातून ॲबेटिंग केले आहे.
गावात तीन दिवस सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश
गावात पुन्हा तीन दिवस सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा डुकरे यांना दिले आहे. कवली गावात वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाखा डुकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल वारंगणे, आरोग्य सहायक विजय पंडित, ज्ञानेश्वर नन्हेरे आदी तळ ठोकुन आहे.