वरणगाव, तळवेल, भुसावळात मयतांवर सामूहिक अंत्यसंस्कार

0
62

नेपाळमधील अपघाताच्या घटनेमुळे समाजमन झाले ‘सुन्न’

साईमत/वरणगाव/प्रतिनिधी:

येथुन अयोध्या आणि तेथुन गोरखपूरहुन खासगी बसने नेपाळ येथे देवदर्शनासाठी जात असलेली भाविकांची बस ५०० फुट खोलदरीतील नदी पात्रात पडल्याने भुसावळ तालुक्यातील २५ भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामध्ये वरणगाव, तळवेल, दर्यापूर, सुकळी (ता. मुक्ताईनगर) आणि भुसावळमधील भाविकांचा समावेश आहे. मयतांवर रात्री उशिरा सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. उर्वरित जख्मींवर नेपाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. नेपाळमधील अपघाताच्या घटनेमुळे समाजमन ‘सुन्न’ झाले आहे.

समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेतील ११० भाविक हे १६ ऑगष्ट रोजी अयोध्या येथील रामकथा श्रवणाला गेले होते. तेथील कथेची सांगता झाल्यानंतर सर्व भाविक गोरखपूर येथुन चार खासगी ट्रॅव्हल्स बसने नेपाळ येथे देवदर्शनासाठी काठमांडुकडे निघाले होते. त्यामध्ये दोन मोठ्या बसेस तर दोन लहान १६ सिटर बसचा समावेश होता. मात्र, दोन मोठ्या बसेसपैकी एक खासगी बस ५०० फुट खोलदरीतील नदी पात्रात पडली. त्याची माहिती काही अंतरावर पुढे गेलेल्या बसमधील भाविकांना समजताच त्यांनी माघारी फिरून घटनास्थळावरील भयानक चित्र पाहून याची माहिती वरणगाव, तळवेल, दर्यापूर, सुकळी, भुसावळ व जळगाव येथील नातेवाईकांना दिल्याने गावांमध्ये एकच खळबळ उडाली. तसेच घटनेची माहिती नेपाळ पोलीस प्रशासनाला मिळताच पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांनी युद्धपातळीवर मदत सुरू केले होते.

यावेळी बसमधील ४० पैकी २५ भाविक, बस चालक व सहचालक अशा २७ जणांचा मृत्यू तर एक तरुणी पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाल्याचे समोर आले. तसेच उर्वरित भाविक जखमी झाल्याने त्यांना नेपाळमधील हत्तानु जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. एक महिला भाविकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

घटनास्थळी केंद्रीय मंत्री खा. रक्षाताई खडसे, आ. संजय सावकारे दाखल

घटनेची माहिती केंद्रीय मंत्री खा. रक्षाताई खडसे आणि भुसावळचे आ. संजय सावकारे यांनी शासनाच्या माध्यमातून संपर्क केला. तसेच त्यांनी तातडीने घटनास्थळी प्रस्थान केले. त्यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भुसावळचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, परिक्षित बऱ्हाटे, अतुल झांबरे यांचा समावेश होता.

मोठी जिवीतहानी टळली

नेपाळमधील पोखरा ते काठमांडु मार्गावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस नदीपात्राच्या खोलदरीत कोसळली. यावेळी नदीच्या पात्रातील एका मोठ्या दगडाला बस अडकल्याने बस पाण्याच्या मुख्य प्रवाहापासून लांब राहिली. अन्यथा बस पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली असती. त्यामुळे मयतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली असती, अशी माहिती समोर आली आहे.

वरणगावला बंदला प्रतिसाद, रात्री अंतिम संस्कार

नेपाळ येथील दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्यांपैकी सर्वाधिक मयतांची संख्या वरणगाव शहरातील आहे. त्यामध्ये सर्वाधिक जावळे व सरोदे परिवारातील सदस्यांचा समावेश आहे. सर्व मयतांवर रात्री वरणगाव येथील स्मशानभुमीत सामूहिक अंतिम संस्कार करण्यात आले. सामूहिक अंतिम संस्कारासाठी विशेष व्यवस्था केली होती. तसेच समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेमुळे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी दुपारी वरणगाव शहर बंदचे आवाहन केले होते. त्यांच्या बंदच्या आवाहनाला व्यावसायिकांनी प्रतिसाद देत बंदमध्ये सहभाग घेतला होता.

तिन्ही मंत्र्यांनीही घेतली सांत्वनपर भेट

अपघाताची माहिती मिळताच शहरात निरामय शांतता होती. तसेच एकमेकांना सावरण्यासाठी प्रयत्न करत होते. मयत झालेले व्यक्ती नातेसंबंधातील असल्याने जावळेवाडा गणपती नगर दर्यापूर तळवेल येथे नातेवाईकांची गर्दी जमली होती. तसेच अपघातस्थळावरून कोणती माहिती मिळते. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच दुपारनंतर मंत्री गिरीष महाजन, मंत्री अनिल भाईदास पाटील, आ. मंगेश चव्हाण यांनी भेट घेऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच दुपारपासून माजी मंत्री एकनाथराव खडसे, रोहिणी खडसे यांनीही भेट दिली. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनीही वरणगाव, तळवेल येथे भेट देवून मयताच्या कुटुंबाचे सांत्वन केले.

भाऊ-बहीण अन्‌ मेहुणे अपघातात मयत

तळवेल येथील शिवसेना उबाठा गटाचे उपतालुकाप्रमुख प्रकाश सुरवाडे हे पत्नी व बहिण सरला तायडे, मेहुणे तुळशीराम तायडे यांच्यासोबत यात्रेत होते. मेहुणे तुळशीराम तायडे हे पोलीस विभागातून सेवानिवृत्त होऊन जळगाव येथे रहिवासाला होते. अपघातात तिघेही जण मयत झाले आहेत. घटनेची माहिती तळवेल येथे त्यांच्या घरी देण्यात आलेली नव्हती. तसेच बाहेरून भेटायला येण्यासाठी याठिकाणी आधीच सांगितले जात होते की, प्रकाश सुरवाडे यांच्या वडिलांना याबाबतची माहिती दिलेली नाही.

राणे परिवार आला ‘उघड्यावर’

भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील सुहास प्रभाकर राणे यांचा टेन्ट हाऊसचा व्यवसाय होता. त्यांच्याकडून शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी रेंट मोफत असायचा तर गरजूंकडून लग्नकार्याचे पैसेही ते घेत नव्हते. या परिवारातील सुहास राणे, पत्नी सरला राणे, मुलगी चंदना राणे या मयत झाल्या आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा जयेश व आई सुमन राणे तसेच काका निवृत्ती राणे हे आहेत. त्यांच्या जाण्याने हा परिवार उघड्यावरती आला आहे.याठिकाणी घटनेची माहिती मिळताच सुहास राणे यांच्या आईने ‘टाहो’ फोडला होता.

बोंडे यांचा नियमित यात्रेचा उपक्रम

गेल्या पाच वर्षापासून तळवेल येथील रहिवासी चारुलता रवींद्र बोंडे, पती रवींद्र पुरुषोत्तम बोंडे हे नियमित विविध यात्रेकरूंना यात्रेनिमित्त बाहेरगावी नेतृत्व हा उपक्रम त्यांचा नेहमीचा होता. यात्रेसोबत जेवण बनविण्यासाठी स्वयंपाकी असल्याने यात्रेकरू त्यांच्या यात्रेला पसंती देत होते.

चार परिवारातील १३ जणांचा मृत्यू

अपघातात चार परिवारांमधील १३ जणांवर काळाने घाला घातला आहे. त्यात वरणगाव येथील माजी नगरसेविका रोहिणी सुधाकर जावळे, माजी नगरसेवक सुधाकर बळीराम जावळे, नातेवाईक सागर कडू जावळे, विजया कडू जावळे, भारती प्रकाश जावळे अशा पाच जणांचा समावेश आहे. त्यापैकी सुधाकर व रोहिणी हे पती-पत्नी होते. वरणगाव येथील सरोदे कुटुंबातील संदीप राजाराम सरोदे, पत्नी पल्लवी आणि पुतण्या अनुप हे तिघे दगावले. सुलभा पांडुरंग भारंबे, गणेश पांडुरंग भारंबे, मिनल गणेश भारंबे आणि परी गणेश भारंबे हे चार तर तळवेल येथील सुहास प्रभाकर राणे, पत्नी सरला राणे, मुलगी चंदना राणे यांचाही मृत्यू झाला. अपघातातील २७ मृतांमध्ये १६ महिला तर ११ पुरूष आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here