स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी:
खेड्या-पाड्यातील होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक, आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या असलेल्या शिष्यवृत्ती आणि वसतीगृहाच्या विविध योजना तसेच त्यासाठी असणारे निकष, पात्रता, कागदपत्रांविषयी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांसाठी सरकारी योजनेतून शिक्षणाच्या आर्थिक खर्चाची तरतूद आहे. त्यामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. यासाठी शासन प्रयत्नशील असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्तींचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन मू.जे. (स्वायत्त) महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती विभाग प्रमुख संतोष मनुरे यांनी केले.
येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समितीतर्फे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता असलेल्या ‘विविध शासकीय शिष्यवृत्ती व धोरण’ विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे होते. यावेळी समन्वयिका प्रा.स्वाती बऱ्हाटे, समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.जयंत इंगळे उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यावेळी संतोष मनुरे यांनी तळागळातील पात्र विद्यार्थ्यांच्या समस्या व त्यांच्यासाठी शासनाने अवलंबलेल्या धोरणाविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी प्रा.ज्योती सोनवणे, प्रा. रुपम निळे, प्रा.संदीप गव्हाळे, प्रा.योगेश धनगर, प्रा. कविता भारुडे, प्रा.विनोद पावरा यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार प्रा.दीपक चौधरी यांनी मानले.