फैजपुरला दि अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी लि.संस्थेची ४७वी वार्षिक सभा खेळीमेळीत
साईमत/फैजपूर, ता.यावल/प्रतिनिधी:
येथील दि अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेने दूध उत्पादकांना म्हशीच्या दुधावर प्रतिलिटर (४.५) साडे चार रुपये व गाईच्या दुधावर प्रतिलिटर (३.५) साडेतीन रुपयाप्रमाणे प्रोत्साहन भाव फरक, सर्व दुधावर प्रति लिटरवर (०.६०) साठ पैसे बोनस, १३ टक्के लाभांश, मिटिंग भत्ता (२००) दोनशे रुपये व दुधाच्या प्रमाणात बक्षीस देण्याचे संस्थेच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केले. संस्थेने जाहीर केलेल्या रकमा दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केल्याचे चेअरमन नितीन राणे यांनी सांगतले. सर्व दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध पुरवठा करण्याचे आवाहन केले. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. फैजपूर येथील अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेची २०२३-२०२४ वर्षांच्या ४७ व्या सर्वसाधारण सभेचे आयोजन संस्थेच्या सभागृहात केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नितीन राणे होते. यावेळी विषय पत्रिकेवर १७ विषय घेण्यात आले. सर्व विषयांवर चर्चा होऊन सभेत सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली.
संस्थेचे कार्य चांगले असल्याने प्रगतीपथावर आहे. दूध ग्राहकांचा विश्वास संपादन करणारी दूध उत्पादक संस्थेची सभासद संख्या ४१७ इतकी आहे तर भागभांडवल पाच लाख २८ हजार २०० इतका व निव्वळ नफा सहा लाख ८३ हजार ५६९ इतका आहे. तसेच दूध उत्पादकांकडून प्रति दिन सातशे लिटरपर्यंत दूध पुरवठा होतो. संस्थेने दूध उत्पादकांना बक्षिस वाटप करण्याची तरतूद केलेली आहे. सर्व दूध उत्पादकांना बक्षिस दिले जाते.त्याचप्रमाणे संस्थेकडून सभासदांच्या गुरांना मोफत लसीकरण दिले जाते.दरम्यान, दूध उत्पादक यांच्याकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे संस्थेकडून दूध उत्पादकांचे हित साधले जाते. सभेत नफ्याच्या रकमेतून संस्थेने दूध उत्पादकांना बक्षिस वितरित केले. २०२३-२०२४ या वर्षात म्हैस व गायचा जास्त दूध पुरवठा करणारे पहिले दहा सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
सभेला ज्येष्ठ संचालक भास्करराव चौधरी, माजी जिल्हा दूध संघाचे संचालक तथा संस्थेचे संचालक हेमराज चौधरी, व्हाईस चेअरमन जितेंद्र भारंबे, चंद्रशेखर चौधरी, मोहन वायकोळे, अजय महाजन, लक्ष्मण झांबरे, रमेश झोपे, विनोद चौधरी, उमाकांत भारंबे, अप्पा चौधरी, विजय पाटील, वंदना कोल्हे, ज्योत्स्ना भारंबे, सचिव सुनील क्षत्रिय, फैजपूर कामधेनू शीतकरण केंद्राचे व्यवस्थापक सचिन पाटील, दूध संकलन अधिकारी खेमचंद पाटील, दूध संघाचे कर्मचारी अमोल धांडे यांच्यासह सभासद उपस्थित होते. यशस्वीतेसाठी लिपिक कांचन राणे, कल्पना कोल्हे, विकास भारंबे, किशोर चौधरी, मंगु तडवी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक चेअरमन नितीन राणे तर आभार कमलाकर भंगाळे यांनी मानले.
दूध उत्पादकांचे हित जोपासून संस्थेने जाहीर केल्याप्रमाणे भाव फरक, बोनस, लाभांश, बक्षीस, मिटींग भत्ता असे ३२ लाख संस्थेने दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. त्यामुळे दूध उत्पादक समाधानी आहे.
-नितीन राणे, चेअरमन अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी, फैजपूर