रेल्वे विभागीय कार्यालयात केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी घेतला रेल्वे कामांचा आढावा

0
20

रेल्वे प्रकल्प, अपग्रेडेशनसह स्थानिक सुविधांच्या संदर्भात माहिती सादर

साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :

भुसावळ रेल्वे विभागीय कार्यालयात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी बैठक घेवून रेल्वे संदर्भात विविध विषयांवर चर्चा करून कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी भुसावळ रेल्वे विभागाचे व्यवस्थापक इती पाण्डेय यांची उपस्थिती होती.

बैठकीच्या सुरूवातीला इती पाण्डे यांनी रेल्वे विभागात सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या पायाभूत सुविधा संदर्भात सविस्तर माहिती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना दिली. त्यात विविध रेल्वे प्रकल्प, अपग्रेडेशन आणि स्थानिक सुविधांच्या संदर्भात माहिती सादर करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी रोड अंडर पास, रोड ओव्हर ब्रीज, पाचोरा, जामनेर, बोदवड रेल्वे कामाचा आढावा, अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत मलकापूर, नांदुरा, रावेर येथील सुरु असलेले रेल्वे काम, पिंपळगाव येथील जमीन अधिग्रहण तसेच खंडवा-सनावद मेमू रेल्वे संदर्भात चर्चा करण्यात आली.

या प्रकल्पांची कामे जलद गतीने करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दिल्या. रेल्वे विभागीय नियंत्रण कार्यालयाला भेट देवून निरीक्षक करत माहिती जाणून घेतली. बैठकीला अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रशासन सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक तांत्रिक एम. के. मीना आदी उपस्थित होते.

पॅसेंजर गाड्यांना थांब्याबाबत चर्चा

रावेर लोकसभा क्षेत्रातील नांदुरा, मलकापूर, बोदवड, वरणगाव, निंभोरा, सावदा, रावेर आदी प्रमुख स्टेशनवर स्थानिक प्रवाश्यांच्या सोयीसाठी जास्तीत-जास्त पॅसेंजर गाड्यांना थांबा देण्याबाबत दखल घेण्यासह अनेक ठिकाणी रेल्वे मार्गावर नव्याने बनविण्यात आलेल्या रोड अंडर ब्रीजमुळे शेत-शिवार किंवा गावठाणमध्ये पाणी साचून शेतकरी व ग्रामस्थांना त्रास होत असल्याने तत्काळ योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या. आचेगावात आरयुबीमुळे गेट बंद झाल्याने रस्त्याची अडचण असल्याने जमीन अधिग्रहित करून रस्ता उपलब्ध करावा तसेच नांदुरा येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या तांत्रिक अडचणी सोडवून काम सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी डीआरएम ईती पांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here