चोपड्यात १०० खाटांचे ‘आरोग्य केंद्र’ झाले २०० खाटांचे

0
30

सिटी स्कॅन मशीनही आली, आ.लता सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चोपडा उपजिल्हा आरोग्य केंद्राच्या विस्तारीकरणाचे आदेश जारी केले आहेत. त्यासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघातील आ.लता सोनवणे आणि माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी पाच वर्षांपासून पत्रव्यवहार करुन प्रदीर्घ प्रयत्न केले होते. त्यावर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्याचे आदेश जारी करुन जमीन अधिकरण व बांधकामासह आवश्यक पदांची यादी लवकरच तयार करुन शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठीही निधीची तरतूद केली आहे.

चोपडा विधानसभा मतदारसंघातील घोडगाव आणि विरवाडे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आ.लता चंद्रकांत सोनवणे यांचा प्रस्तावही शासनाने मान्य करुन दोन्ही ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील सुमारे ११ गावे आणि सहा आदिवासी पाड्यांतील ग्रामीण जनतेला स्थानिक स्वरुपात प्राथमिक आरोग्यसेवेचा लाभ घेता येणार आहे.

सिटी स्कॅन मशीन लवकरच बसविणार

चोपडा वासियांसाठी सिटी स्कॅन मशीन आले आहे. ते लवकरच बसविण्यात येणार असल्याचे आ.लताताई सोनवणे यांनी सांगितले. सर्वांना सहज उपलब्ध असणाऱ्या आ.लता सोनवणे, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे हे चोपडा तालुक्यासह विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव सक्रीय आहे. ते सर्वांशी कायम जनसंपर्क ठेवत असतात.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्याचे मानले आभार

शासनाच्या निर्णयावर आ.लता सोनवणे आणि माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील यांचे आभार मानले आहेत. तसेच चोपडा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी आरोग्य सुविधेसाठी मतदारसंघाच्या आ.लता सोनवणे आणि माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे या दोघांनाही धन्यवाद देत त्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here