वार्डाचे चारही नगरसेवक, ठेकेदार मस्त अन् नागरिक त्रस्त
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील पिंप्राळा परिसरातील सोनी नगर ते सावखेडा रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने वाहन चालकांना जणू काही ‘उंटावरची स्वारी’ करत असल्याचा जाणवत आहे. याबाबत वार्ड क्र. १० चे चारही नगरसेवक, रस्त्याचा संबंधित ठेकेदार मस्त चारचाकी वाहनात फिरत आहे. मात्र नागरिक त्रस्त आहे. दुसरीकडे नगरसेवक आणि ठेकेदार रस्त्याकडे रस्त्याचे उद्घाटन होऊन सात महिने झाले ढुंकूनही पाहत नाही. याच रस्त्यावर एका ट्रॅक्टर चालकाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आणखी किती बळी घेण्याची वाट संबंधित ठेकेदार बघत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करीत आहे.
पिंप्राळा वटुकेश्वर मंदिर ते सावखेडा रस्ता मंजूर झाला आहे. रस्त्याचे उद्घाटन गेल्या २५ फेब्रुवारी रोजी आ.सुरेश भोळे यांच्या हस्ते झाले होते.यावेळी एक पोतेभर श्रीफळ मान्यवरांच्या हस्ते फोडण्यात आले. रस्यावर फक्त खडी टाकून दिले. पण अद्यापही कामाचा मुहूर्त ठेकेदाराला मिळत नाही. ठेकेदार कुठे गायब झाले आहे, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. रस्त्यासाठी हुडको येथील नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले होते. मात्र संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार कुंभकर्णी झोपेत आहे.
वटुकेश्वर मंदिर ते सोनी नगर रस्त्याचे ‘तीन तेरा’
पिंप्राळा परीसरातील वटुकेश्वर मंदिर, कुंभार वाडा ते सावखेडा रोड मंजूर झाला आहे. रस्त्याचे १२ वाजले आहे. खड्डे चुकवत वाहन चालकांना कसरत करावी लागते. जणुकाही उंटावरची स्वारी करत आहोत. अशा रस्त्यामुळे वाहनचालकांना पाठीचा मणक्याचे त्रास होत आहे तर अनेकवेळा दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. पांडुरंग साईजवळ खड्डेच खड्डे पडले आहे. नगरसेवक नुसते थातुर माथुर मुरूम टाकतात आणि सोशल मीडियावर फोटो टाकून चमकोगिरी करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. वार्ड क्र.१० च्या चारही नगरसेवकांनी एकदा वटुकेश्वर मंदिर ते सोनी नगरपर्यंत दुचाकीने प्रवास करून दाखवा जेणेकरून लक्षात येईल की, सर्वसामान्य नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतो, असे नागरिकांनी आवाहन केले आहे.
एकाचा बळी आणखी किती बळी घेणार
गेल्या १ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता रामदास बुधा सोनवणे (वय १९, रा.सावखेडा, ता.जळगाव) हा पिंप्राळा येथून सावखेडा जात असतांना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने त्यांच्या मृत्यू झाल्याची घटना घडली. जर का सावखेडा रस्ता झाला असता तर त्याचा बळी गेला नसता आणखी किती बळी घेणार असल्याची वाट ठेकेदार आणि संबधित अधिकारी बघत आहे.आता तरी रस्त्याचे कामे सुरू करा, अशी ओरड नागरीकांकडून होत आहे.
चैतन्य किराणाजवळ लहान पुलाची मागणी
हुडको, आझादनगर, खंडेराव नगर येथुन सोनीनगरकडून मोठा नाल्यातून सांडपाण्याचा पाणी थेट चैतन्य किराणा जवळ साचल्याने तलावासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे याठिकाणी लहान पूल बांधण्यात यावा. कारण पावसाळ्यात सांडपाण्याचा तलाव साचल्याने सोनी नगर, श्रीराम नगर, ओंकार पार्क, बाबुराव नगर, गणपती नगर, सावखेडा येथील नागरिकांना येण्या-जाण्याचा रस्ता बंद होतो. त्यामुळे याठिकाणी लहान पूल बांधण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पथदिव्यांअभावी पसरला अंधार
सावखेडा रस्त्यावर पथदिवे नसल्याने महिलांना रात्री पायदळ येताना भिती वाटते. त्यामुळे पथदिवे सुरु करण्यात यावे. रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे. चारही नगरसेवक, संबंधित ठेकेदार कुंभकर्णी झोपले असून त्यांना जागे करण्यासाठी परिसरातील महिलासहित तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.