साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव
‘प्रत्येकाला कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भविष्याचा अचूक अंदाज बांधावा लागतो. त्यादृष्टीने वर्तमानात कृती करावी लागते. कुठं थांबलं पाहिजे, वळण केव्हा घेतले पाहिजे हे डोळसपणे बघावे लागते. बुध्दिबळ हा खेळ सुद्धा आपल्याला सकारात्मक जीवन जगण्याची कला शिकवितो. आत्मचिंतन करुन भविष्यातील लढाईची रणनिती आखण्यासाठी मदत करतो. सृजनशील विचारांना चालना बुध्दिबळ खेळातून मिळते. असे प्रतिपादन माजी आ. मधुभाभी जैन यांनी केले.
एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीमचे प्रायोजकत्व लाभलेल्या महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जळगाव येथील खान्देश सेंट्रल येथे दि. २५ पासून २८ जुलै २०२४ दरम्यान होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी प्रमूख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, महाराष्ट्र बुध्दिबळ असोसिएशन व जळगाव जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष फारूक शेख, सचिव नंदलाल गादिया, जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे व्हाईस प्रेसिडेंट-मिडीया अनिल जोशी, चिफ ऑरबिटर गौतम रे उपस्थित होते. नंदलाल गादिया यांनी जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनने राबवित असलेल्या उपक्रमांविषयी प्रास्ताविकात सांगितले.
जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी सांगितले की, ‘जैन स्पोर्टस अकॅडमी व जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनद्वारे आयोजीत फिडे मानांकित स्पर्धेमुळे बुद्धिबळ खेळाला प्रोत्साहन मिळेल. राज्यातून आलेल्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा मोलाची आहेच मात्र जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ती पोषक ठरेल.’
जैन इरीगेशन सिस्टीम्स लि, जैन स्पोर्ट्स अकॅडमी व खान्देश सेंट्रल यांच्या सहकार्यातून झालेल्या राज्य वरिष्ठ खुल्या गटासाठी राज्यातून १६२ बुद्धिबळ पटूंनी सहभाग घेतला. स्विस लिग पध्दतीने खेळल्या गेल्या या स्पर्धेत आज दोन डाव खेळले गेले. सोलापूरची सृश्रीती विकास मोरे या अंध खेळाडूंने सहभाग घेऊन सर्वांची मने जिंकली. तर जळगावचा कबीर श्रीकांत तडवी या सहा वर्षाच्या चिमूकल्याने सौ. मधुभाभी जैन यांच्या वजरीला मागे घेण्यास भाग पाडले. ७३ वर्षाचे वयस्क खेळाडूंनी आपला अनुभव अजमावला.
जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे उपाध्यक्ष शकील देशपांडे, सहसचिव चंद्रशेखर देशमुख, कार्यकारणी सदस्य तेजस तायडे, रविंद्र दशपुत्रे, विवेक दाणी आदी उपस्थित होते. बुध्दिबळाचे आंतरराष्ट्रीय पंच प्रविण ठाकरे, जैन स्पोर्टस ॲकडमीचे समन्वयक रविंद्र धर्माधिकारी यांच्यासह जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकारी यावेळी उपस्थित होते. अरविंद देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर देशमूख यांनी आभार मानले.
