साईमत /न्यूज नेटवर्क / मुंबई
गुजरात टायटन्सची आशिष नेहरा साथ सोडणार असल्याच्या व युवराजसिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. आयपीएल चॅम्पियन गुजरात टायटन्स संघाचे २०२५ हे चौथे वर्ष असेल. गुजरात टायटन्सने आयपीएलच्या पर्दापणातच चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. नंतर अवघ्या दोन वर्षातच कर्णधार हार्दिक पंड्याने संघ सोडला त्यानंतर जबाबदारी शुभमन गिलवर सोपवण्यात आली. आता पुढील हंगामात संघाला अजून धक्क्याला सामोरे जावे लागणार आहे.
आशीष नेहरा गुजरात टायटन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत ते आता संघ सोडणार असल्याच्या बातम्या आहेत. त्यांच्यासोबत विक्रम सोळंकीही संघ सोडण्याच्या तयारीत आहे. आशिष नेहरा आणि विक्रम सोलंकी पदार्पणापासून संघासोबत आहेत.
अशा स्थितीत नेहराने संघ सोडल्यास गुजरातसाठी तो मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नसेल. नेहरापूर्वी माजी कर्णधार हार्दिक पंड्याही वेगळा झाला होता. त्यामुळे आयपीएलच्या 17 व्या मोसमात गुजरातची कामगिरी खराब दिसली.
आशिष नेहरा गुजरात टायटन्समधून बाहेर पडल्यानंतर माजी भारतीय वेगवान गोलंदाज युवराज सिंग गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक बनू शकतो. नेहराला पर्याय म्हणून युवराज सिंगचे आगमनही संघासाठी चांगले ठरू शकते, परंतु नवीन कोचिंग स्टाफमुळे खेळाडूंमधील समतोल राखण्यास वेळ लागू शकतो. टीम इंडियाला 2007 चा टी 20 विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक 2011 जिंकून देण्यात युवराजने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा परिस्थितीत युवराज कोचिंग कारकिर्दीतही चमत्कार घडवेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते.
शुभमन गिल सध्या गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. युवराज सिंगने लहानपणापासूनच शुभमनला क्रिकेटचे धडे दिले आहे. अशा स्थितीत युवराज सिंग गुजरातचा प्रशिक्षक झाला तर शुभमन गिलला त्याची साथ मिळेल.



