साईमत/ न्यूज नेटवर्क/ रावेर :
जुना सावदा रावेर रस्त्यावरील नागझिरी नाल्यावरील नवीन पुलाचे काम सुरु झालेले आहे. पुलाचे काम सुरु असतांना परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणताही पर्यायी रस्ता जवळपास नाही. नागरिकांना सोयीचा पर्यायी रस्ता तयार करावा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश चिंधु पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात नमुद केले आहे की, सावदा रावेर जुना रस्त्यावरील नागझिरी नाल्यावरील पुलाचे काम सुरु झालेले आहे. काम सुरू करण्यापुर्वी ठेकेदाराने पर्यायी रस्ता बायपास वाहतुकीसाठी करणे आवश्यक असते. तशी अंदाज पत्रकात तरतूद असते. कामही संथगतीने सुरू आहे. नागझिरी नालापार शाळा, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, वसाहत असल्याने जाण्यासाठी नागरिकांना जवळपास बायपास रस्ता सध्या नाही.
२६ जुलैपर्यंतचा इशारा
रावेर सावदा जुना रोड नागझिरी नाल्याजवळ पर्यायी रस्ता तात्काळ करावा, अन्यथा २६ जुलै रोजी रावेर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.यासंदर्भात तहसीलदार कापसे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी रावेर शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश चिंधु पाटील, डी.डी.वाणी, दिलीप साबळे, महेश तायडे, पुंडलिक चावदास कोळी, नितीन चौधरी, छबू दगडू उपस्थित होते.
संबंधित अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नवीन वसाहतीतील लोकांना तसेच परिसरातील ग्रामीण भागातील लोकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना जे या रस्त्याने येणे-जाणे करतात. त्यांना फारच लांबुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून कामानिमित्त ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर ट्रॅफीकही वाढली आहे. पुलाचे काम सुरु असतांना बायपास रस्ता न काढल्याने शाळेतील विद्यार्थी तसेच शासकीय कार्यालय, तहसील कचेरी, पंचायत समिती कार्यालय, बँक, कोर्ट यात कामानिमित्त जाण्यासाठी १ ते २ कि.मी.च्या फेऱ्याने जावे लागत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.
