साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव
शहरातील एमआयडीसी परिसरातील सुनील आर. मंत्री यांच्या मुख्य कार्यालयातील संगणक प्रणालीवर सायबर अटॅक होऊन सर्व डेटा हॅक करण्यात आल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली असून या हल्यास जबाबदार धरत सुनील आर. मंत्री यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात येथील इंदू कॉम्प्युटर्स चे संचालक दीपक वडनेरे यांच्या विरोधात फसवणुकीची गुन्हा दाखल केला आहे.
सुनील आर. मंत्री ही संस्था ऑटोमोबाईल, मोबाईल, सरकारी कॉन्ट्रॅक्ट, प्रॉपर्टी खरेदी-विक्री, मालमत्ता भाडेकरार, वैद्यकीय सेवा, वेअरहाऊसिंग असा व्यवसाय करीत असतात. संस्थेचे मुख्य कार्यालय जळगाव स्थित मेहरुण शिवार गट नं. 78, प्लॉट नं. 1 एमआयडीसी येथे आहे. या मुख्य कार्यालयातील संगणकाचे देखभाल-दुरुस्ती इत्यादीची कामे दीपक वडनेरे यांची संस्था इंदू कॉम्प्युटर्स जळगाव हे करीत असतात. ‘सोफोस सपोर्ट’ या कंपनीची फायरवॉल ही लावण्याकरिता तीन वर्षाची रक्कम दि. 2 जून 2024 रोजी रु. 89,135/- रुपये दीपक वडनेरे यांना दि. 5 जून 2024 रोजी देण्यात आले होते. मात्र, त्यांनी फायरवॉलचे रिन्युअल अर्थात नूतनीकरण न केल्यामुळे व सुरक्षा न मिळाल्यामुळे सुनील आर. मंत्री यांच्या मुख्य कार्यालयातील संगणक प्रणालीवर सायबर अटॅक होऊन सर्व डेटा हॅक होऊन नुकसान झालेआहे. दि. 21 जून 2024 पर्यंत असलेली मुदत आणि 15 दिवस अगोदर दिलेली रक्कम, नूतनीकरण न झाल्यामुळे हा सायबर हल्ला झाल्याचे तक्रारीत नमूद केलेले आहे. यासंदर्भात दीपक वडनेरे, संचालक – इंदू कॉम्प्युटर्स, जळगाव यांच्याविरुद्ध मंत्री यांनी तक्रार दाखल केलेली असून हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गिरीधर बडगुजर हे तपास करीत आहेत.