साईमत/ न्यूज नेटवर्क/चाळीसगाव :
तालुक्यातील ब्राह्मणशेवगे पंचक्रोशीत पंधरा दिवसांपासून वरुणराजाने दडी मारली आहे. वरुणराजा चांगला बरसावा, यासाठी दरवर्षी पावसाळा सुरु होण्याअगोदर प्रत्येक गाव वेशीवरून शिवाई देवीची पूजाअर्चा करून पुढील गावाच्या वेशीवर ढोलताश्यासारखे वाद्य लाऊन वाजत गाजत पुढच्या वेशीवर ठेवले जाते. अशा प्रकारे दरवर्षी ही परंपरा जपली जात आहे.
जुन्या परंपरांनुसार एका गावाने दुसऱ्या गावाच्या शिवेवरून (वेशीवरून) आपल्या गावाच्या शिवेवर (वेशीवर) छोटे बैलगाडे, टोपली, अंडे, नारळ तसेच हळद कुंकुने पूजाअर्चा करुन गाव शिवेवर ठेवण्यात आलेल्या बैलगाडेचे पूजन करुन वरुणराजाला साकडे घालण्यात येते.
यानंतर दुसऱ्या गावाच्या शिवेवर (वेशीवर) अशाच पद्धतीने पुढील गावाच्या वेशीवर सोडून दिले जाते. त्यामुळे वरुणराजा बरसतो, अशी शेकडो वर्षांपासून जुनी परंपरा चालत आली आहे. ब्राह्मणशेवगे येथील गाव शिवपूजन पोलीस पाटील राजेंद्र माळी, शांताराम शिर्के आदींनी करुन वरुणराजाला साकडे घातले.