साईमत/ न्यूज नेटवर्क/चाळीसगाव :
शहरातील प्रभाग १० मधील हंस चित्र मंदिराकडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्यावतीने काँक्रिटीकरण रस्त्याचे काम चार ते पाच दिवसांपासून सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रावसाहेब थोटे यांच्या नियंत्रणाखाली काम सुरू आहे. मात्र, थोटे रस्ता होत असताना कामावर येत नसल्याने कामाची गुणवत्ता ठेकेदारामार्फत राखली जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आ.मंगेश चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता बैसाने यांना सूचना करून उच्च दर्जाचे काम करण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी प्रभागातील नागरिक करत आहेत.
काँक्रिटीकरणाचे काम करत असताना त्यात सिमेंट गज वाळू ज्या पद्धतीने वापरली पाहिजे त्या पद्धतीने न वापरता कमी प्रतीचे मटेरियल वापरले जात आहे. या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता रावसाहेब थोटे यांच्याकडे असताना कामावर ते साधे फिरकत नाही. त्यामुळे रस्त्याची गुणवत्ता संबंधित ठेकेदार राखत नसल्यामुळे लाखो रुपयांचा निधी हा पाण्यात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या काँक्रिटीकरणाच्या रस्त्यावर आळे करून पाणी भरणे गरजेचे आहे. मात्र, त्यावर साधे बारदान टाकले जात नाही. पाणी मारले जात नसल्यामुळे ह्या रस्ता किती काळ टिकेल, ही शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.
रस्त्याचे ‘तीन तेरा’ वाजणार
यासंदर्भात रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता श्री.बैसाणे यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष करत शाखा अभियंता रावसाहेब थोटे यांचीच बाजू घेतली. त्यामुळे रस्त्याचे ‘तीन तेरा’ वाजल्याशिवाय राहणार नसल्याचा सूर आता प्रभागातील नागरिकांमध्ये उमटू लागला आहे.