साईमत/ न्यूज नेटवर्क/फैजपूर :
स्व. मधुकरराव चौधरी यांनी आपल्या ३५ वर्षाच्या राजकारणात राहून आपल्या चरित्रावर कोणत्याही प्रकारचा डाग लागू दिला नाही, हे विशेष आहे. त्यामुळे स्व.मधुकरराव चौधरी यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आदर्श आजच्या राजकारण्यांनी घ्यावा,असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. लोकसेवक बाळासाहेब स्व.मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञता सोहळा रविवारी, ७ जुलै रोजी खिरोदा येथे आयोजित केला होता.त्यावेळी कृतज्ञता सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
संयुक्त महाराष्ट्राचेे वातावरण होते. अशा संतप्त वातावरणात निवडून आल्यानंतर मधुकरराव यांना यशवंतराव चव्हाण यांनी पहिल्याच वेळी मंत्री केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात तापी व सातपुडा परिसराचा विकास, प्रक्रिया उद्योग सुरू केले. उमवि, विमानतळ, इंजिनिअरिंग कॉलेज विधानसभा अध्यक्ष असले तरी शिक्षणमंत्री म्हणून त्यांची किर्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. त्यांनी शिक्षणावरील काढलेली श्वेत पत्रिका ऐतिहासिक ठरली.
जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचा पाया रचणारे, तापी परिसराला सुजलाम्-सुफलाम् करणारे नेतृत्व म्हणून स्व.मधुकरराव चौधरी हे एक थोर नेते महाराष्ट्राला लाभले, असे ते म्हणाले.
यांची होती विशेष उपस्थिती :
व्यासपीठावर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी सभापती अरुणभाई गुजराथी, माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे, माजी आ. रमेश पाटील, महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, आ.शिरीषदादा चौधरी, युवा नेते धनंजय चौधरी, माजी महापौर जयश्री महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
खिरोदा, ता.रावेर : स्व.मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे आयोजित कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केळीला पीक विमा लागू केल्यामुळे आज जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना होत असलेल्या लाभाप्रित्यर्थ जिल्ह्याच्यावतीने आभार म्हणून केळीचा घड भेट देऊन सत्कार करतांना शेतकरी प्रतिनिधी सोबत उपस्थित मान्यवर.