साईमत/ न्यूज नेटवर्क/चाळीसगाव :
पंचक्रोशीला पंढरपुरच्या वारीची अशी मोठी परंपरा आहे. टिळक चौकातील तीनशे वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदीर या परंपरेचे प्रतिक म्हणता येईल. वै. ह.भ.प. मोतीराम महाराज यांनी पंढरपूर वारीचा पाया रचला तर बेलदारवाडी येथील सिद्धेश्वर आश्रमाचे प्रमुख ह.भ.प. १००८ महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली यांनी यावर कळस चढविला. गावोगावी अलंकापुरीची वारी करणारे असंख्य कुटूंबे, परिवार आहे. वारकरी कुटुंबाचा वारसा असणारे आ.मंगेश चव्हाण यांनी २०१९ पासून चाळीसगाव मतदारसंघातील हजारो वारकऱ्यांसाठी “भक्ती जेष्ठांची… वारी पंढरीची” असा अभिनव उपक्रम सुरु केला. परिस्थितीमुळे असो की वेळेमुळे असो ज्यांना पंढरीची वारी शक्य नाही अश्या भाविकांना मोफत प्रवास, जेवण, निवास व्यवस्था आदींच्या माध्यमातून पंढरीचे दर्शन घडविले जाते. २०१९ पासून कोविड काळातील खंड वगळता आतापर्यंत १२ हजाराहून अधिक भाविकांना आ.मंगेश चव्हाण यांनी पंढरपूर नेले आहे.
यावर्षी त्यांच्या माध्यमातून दोन विशेष रेल्वे वारकऱ्यांसाठी आरक्षित केल्या आहे. ६ आणि ९ जुलै रोजी विशेष रेल्वेने १० हजार वारकरी भाविकांना पंढरपूर नेण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यासाठी पंढरपूर वारी नियोजन समिती, भारतीय जनता पार्टी, शिवनेरी फाउंडेशनचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. चाळीसगाव तालुक्यातील हजारो वारकऱ्यांच्या नामघोषात यावर्षीही पंढरी दुमदुमणार आहे.
असा असेल पंढरपूर वारीचा प्रवास
बुधवारी, १० जुलै रोजी सकाळी ६ वाजता पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे विशेष ट्रेनचे आगमन व पायी चालत श्री शनि महाराज संस्थान मठ, सांगोला रोड, पंढरपूरकडे प्रस्थान, सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजता सवडीनुसार चंद्रभागा स्नान, श्री विठ्ठल रुख्मिणी दर्शन, सायंकाळी ४ वाजता श्री शनि महाराज मठ येथे सामूहिक हरिपाठ आणि आ.मंगेश चव्हाण यांचा वारकऱ्यांशी संवाद, सायंकाळी ७ वाजता श्री शनि महाराज मठ येथून पंढरपूर रेल्वे स्टेशनकडे पायी चालत प्रस्थान आणि विशेष ट्रेनने परतीच्या प्रवासाला सुरुवात. ( ७ आणि १० जुलै रोजी पंढरपूर येथे चाळीसगाव येथून आलेल्या वारकऱ्यांसाठी भोजनाची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ तसेच सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत श्री शनि महाराज संस्थान मठ, सांगोला रोड, पंढरपूर येथे राहील)
माझ्यासाठी पांडुरंगाचाच आशीर्वाद : आ.मंगेश चव्हाण
पंढरपूर वारीची पालखी २०१९ मध्ये पहिल्यांदा खांद्यावर घेतली. दोन हजार ३०० ज्येष्ठ नागरिकांना लक्झरी बसद्वारे पंढरपुरात नेले. विठूरायाच्या दर्शनाने ते सुखावले. पांडुरंगांच्या आशीर्वादाने माझ्यासाठी विधानसभेचे दरवाजे उघडले गेले. सर्वसामान्य कष्टकरी, वारकऱ्याचा मुलगा आमदार झाला. गेल्या दोन वर्षांपासून २४ डबे असणाऱ्या विशेष रेल्वेने हजारो भाविकांना घेऊन ‘चाळीसगाव ते पंढरपूर’ वारी आयोजित केली होती. त्यांच्या प्रवासासोबतच चहा, नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आदी उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षी चाळीसगाव शहर आणि शहरालगत असणारी गावे यांच्यासाठी १ तसेच इतर उर्वरित ग्रामीण भागातील गावे यांच्यासाठी १ अश्या एकूण दोन विशेष रेल्वेंच्या माध्यमातून १० हजार वारकरी मायबापांना पंढरीचे दर्शन घडविण्यात येत असल्याची प्रतिक्रिया आ.मंगेश चव्हाण यांनी दिली.