साईमत/ न्यूज नेटवर्क/यावल :
संपूर्ण यावल शहराचे नाक असलेल्या फालकनगरमध्ये दर्शनी भागातील गटारींचा आणि रस्त्याचा कसा बोजबारा वाजला आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत लागत आहे. यावल शहरातील अनेक भागात स्वच्छता आणि आरोग्य विभागाच्या अभियंत्यांचे कामकाज कसे चालले आहे, हे दिसून येत आहे. त्यांच्या कामाचा लक्षवेधी नमुना आणि पुरावा समोर आला आहे.
यावल नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात भुसावळ रस्त्यावरील फालकनगर एस.टी.बस स्टॉपजवळील भागात म्हणजे सद्गुरु ऑटोपासून पत्रकार डी.बी.पाटील यांच्या घरापर्यंतच्या व आजूबाजूच्या परिसरात गटारींची आणि रस्त्याची किती व कशी दयनीय अवस्था झाली आहे. रहिवाशांना किती त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे अभियंता आणि आरोग्य विभागाच्या प्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संपूर्ण फालकनगरमध्ये यावल नगरपालिका कामकाजाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
प्रत्यक्ष कामावर किती मजूर
स्वच्छता व पाणीपुरवठा विभागात प्रत्यक्ष कागदोपत्री किती कामगार, मजूर दाखविले आहेत. प्रत्यक्ष कामावर किती मजूर असतात. कागदपत्रे दाखविलेल्या मजुरांच्या नावे पेमेंट कसे दिले जाते? घनकचरा प्रकल्पात असलेली मशिनरी प्रत्यक्षात सुरू आहे की बंद? प्रत्यक्षात ओला व सुका घनकचरा किती संकलन केल्याचे व त्यावर प्रक्रिया केल्याचे दाखवून प्रत्यक्षात किती कचऱ्यावर प्रक्रिया झाली? त्याची विल्हेवाट कशी लावली? वीज बिल प्रत्यक्षात किती भरले जात आहे, त्याची चौकशी केल्यास मोठा घोळ, गैरप्रकार आणि आर्थिक उधळपट्टी कशी झाली आहे, हे दिसून आल्याशिवाय राहणार नाही, असे संपूर्ण यावल शहरात चर्चिले जात आहे.