साईमत/ न्यूज नेटवर्क/मुक्ताईनगर :
येथील प्रभाग क्रमांक १७ मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात ‘माझी लाडकी बहिण योजना’ याविषयी तसेच योजनेच्या अर्जाविषयी अंगणवाडी सेविका यांच्यासाठी नुकतीच मार्गदर्शनासह कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी आ.चंद्रकांत पाटील होते. याप्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार गिरीश वखारे, गटविकास अधिकारी निशा जाधव, संजय गांधी निराधार योजनेची समितीचे अध्यक्ष आनंदराव देशमुख, नायब तहसीलदार निकेतन वाडे, बालविकास प्रकल्पाधिकारी संपदा संत, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, आमदार पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी उपस्थित होते. तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. याप्रसंगी अंगणवाडी सेविकांनी ‘नारीशक्ती ॲप’ डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले.
शासन प्रत्येक कामासाठी ५० रुपये प्रोत्साहनपर भत्ता सेविकांना देणार असल्याचे सांगण्यात आले. संजय गांधी निराधार योजनाअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना त्याचे अर्ज भरता येणार नाही. पीएम किसान व सीएम किसान योजना म्हणून प्रति वर्ष १२ हजार रुपये महिलांना मिळत असतात. त्या महिलांना ‘माझी लाडकी बहिण योजना’ तील फरकाचे सहा हजार रुपये मिळतील, असे सांगत आधार कार्ड व बँक खाते लिंक करण्यात यावे. तसेच ओटीपीच्या संदर्भात अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरताना खबरदारी घेण्यात यावी. जेणेकरून महिलांची आर्थिक फसवणूक होणार नाही, असे निर्देशही आ.चंद्रकांत पाटील यांनी दिले.
कुऱ्ह्याला मंगळवारी पहिले शिबिर होणार
यापुढे विभागनिहाय तालुक्याचे शिबिर घेण्यात येणार आहे. पहिले शिबिर कुऱ्हा येथे मंगळवारी घेण्यात येणार आहे. याप्रसंगी अर्ज हे प्रशासनातर्फे पुरविण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांनी गावात जाऊन अर्ज भरायचे आहे. यासंदर्भात काही अडचण असेल तर कार्यकर्ते मदत करतील, असेही आ.पाटील यांनी सांगितले.
जागा उपलब्ध झाल्यानंतर हॉल बांधून देणार
यावेळी अंगणवाडी सेविकांनी आपल्या शंका, विविध प्रश्न याठिकाणी उपस्थित करुन त्याचे निरसन आमदार तसेच प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.महिलांनी अंगणवाडी सेविकांना बैठक घेण्यासाठी जागा नसल्याने हॉल बांधून देण्याची मागणी केली तर आ.चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ जागा उपलब्ध झाल्यानंतर हॉल बांधून देणार असल्याचे जाहीर केले.
