साईमत/ न्यूज नेटवर्क/यावल :
महाराष्ट्र राज्य सरकारने सोमवारी, १ जुलै २०२४ पासून महाराष्ट्र राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी यावल तालुक्यासह शहरात महिलांनी आपली घरातील व काही आवश्यक कामे सोडून तलाठी कार्यालयात, सुविधा केंद्रावर आणि झेरॉक्स दुकानावर मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आहे. तसेच महिलांना अर्ज भरून देण्यासाठी अनधिकृत लिखाण करणाऱ्या काहींनी (अधिकृत वेंडर नव्हे) महिलांच्या अज्ञानाचा व गर्दीचा फायदा घेऊन लिखाणासाठी पन्नास, शंभर रुपये न घेता ५०० ते १००० रुपये घेतल्याने महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू १ जुलैपासून सुरू करण्यात आली.
योजनेमुळे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध होऊन रोजगार निर्मितीस चालना मिळेल. त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन होईल.राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर होतील. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळेल. महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा होणार असल्याने आणि या उद्देशाने २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा घटस्फोटीत, परितक्त्या आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
या महिला पात्र राहतील
लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे. याप्रमाणे पात्र महिला संबंधित कागदपत्रे व दाखले प्राप्त करण्यासाठी तलाठी व संबंधित कार्यालयात तसेच झेरॉक्सच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.