साईमत/ न्यूज नेटवर्क । चाळीसगाव ।
शेतकऱ्याने बँकेतून पैसे काढून ते नायलॉनच्या पिशवीत ठेवून ती दुचाकीला अडकवली. नंतर इलेक्ट्रीक दुकानात पाण्याच्या मोटरचे स्टार्टर घेण्यासाठी गेला. ही संधी साधून १८ वर्षाच्या मुलाने दुकानाबाहेर लावलेल्या दुचाकीला लटकावलेली पिशवी घेऊन पोबारा केल्याची खळबळ घटना २६ जून रोजी दुपारी १२.५१ वाजेच्या सुमारास गणेश रस्त्यावरील सुयोग संगम इलेक्ट्रीक दुकानासमोर घडली. पिशवीत एक लाख ४२ हजार रूपयांची रोकड आणि बँकेचे चेकबुक होते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील चितेगाव येथील शेतकरी पंकज मच्छिंद्र पाटील यांनी २६ जून रोजी चाळीसगाव येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून सुमारे एक लाख ४२ हजार रूपये काढले. हे पैसे त्यांनी नायलॉनच्या पिशवीत ठेवले. ही पिशवी दुचाकीच्या हँडलला लटकावून ते दुचाकीने पाण्याच्या मोटारीचे स्टार्टर घेण्यासाठी गणेश रस्त्यावरील सुयोग संगम दुकानात गेले. दुचाकी दुकानाबाहेर लावलेली होती. ही संधी साधून आकाशी रंगाचा टी शर्ट आणि लाल रंगाची पॅन्ट घातलेल्या १८ वर्षाच्या मुलाने दुचाकीला लटकावलेली पिशवी घेऊन पोबारा केला. याप्रकरणी पंकज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार योगेश बेलदार करीत आहेत.