साईमत/ न्यूज नेटवर्क । मलकापूर ।
शहरातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.राहुल रमेश चोपडे यांच्या चुकीच्या उपचार पद्धतीने मुलाच्या आयुष्याचे नुकसान झाले असल्याची तक्रार पीडित माता पूनम भारंबे यांनी गेल्या काळात केली होती. पीडित मातेच्या तक्रारीवरून तीन सदस्य समिती डॉ.चोपडेविरुद्ध गठीत केली होती. २६ जून रोजी मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे चौकशी करण्यासाठी समिती आल्यावर समितीतील सदस्यांची चुकीची वागणूक व चौकशीची चुकीची पद्धत पाहून पीडित मातेने समितीला विरोध दर्शविण्यासाठी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. त्यामुळे गठीत चौकशी समिती वादाच्या ‘भोवऱ्यात’ सापडली आहे.
सविस्तर असे की, डॉ.राहुल चोपडे यांच्याविरुद्ध नेमलेल्या तीन सदस्य समितीकडून चौकशीसाठी पीडित माता पूनम भारंबे, पीडित मुलगा दुर्गेश भारंबे आणि बऱ्हाणपूर येथील डॉ.सुबोध बोरले यासह आरोप केल्या गेलेले डॉ.राहुल चोपडे यांना चौकशीसाठी समितीकडून बोलाविण्यात आले होते. मात्र, डॉ.राहुल चोपडे चौकशी समिती समोर दिसून आले नाही. तरीही चौकशी समितीकडून चौकशी सुरू झाली. दरम्यान, चौकशी समितीने पीडित मुलगा दुर्गेश याला एका बंद खोलीत नेऊन दार बंद केले. दुर्गेश व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश देण्यास समितीने नकार दिला होता. त्यामुळे पीडित मातेने समितीला विनंती केली की, ‘मी मुलाची आई आहे तो आधीच घाबरलेला आहे. मला मुलाजवळ येऊ द्या!’ तरीही समितीने काहीही एक ऐकले नाही. त्यामुळे पीडित मातेने संतापून समितीला व समितीच्या चौकशीला विरोध केला. नुसता विरोधच नव्हे तर काळे झेंडे दाखवून समितीचा निषेध पीडित मातेने व्यक्त केला.
बंद खोलीत पीडित दुर्गेश सोबत घडले तरी काय?
गोपनियतेच्या नावाखाली चौकशी समिती सदस्यांनी पीडित दुर्गेश भारंबे याला नेऊन दार बंद केले. आईने आक्रोश केला व कशीबशी आत शिरली तेव्हा पीडित मुलाने सांगितले की, त्याला जोर जबरदस्तीने चालण्यासाठी धाकधपटशहा करण्यात आले. पायाला सुयाही टोचण्यात आल्या. एवढेच नव्हे तर मुलाच्या पायाची पट्टीही काढण्याचा प्रयत्न झाला. बॉईज ड्रेसिंगची व्यवस्था नसताना अशा बेजबाबदार पद्धतीने मुलाच्या पायाची पट्टी काढली असती तर इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता होती. एकंदरीत चौकशी समितीकडून गोपनीयतेच्या नावाखाली धाकदपटशहा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
डॉ.राहुल चोपडे चौकशीवेळी अनुपस्थित
चौकशी समितीकडून चौकशीसाठी आरोप असलेले डॉ.राहुल चोपडे चौकशी दरम्यान दिसून आले नाही. म्हणजे ज्यांच्यावर आरोपाचा ठपका आहे तेच चौकशी समोर हजर नसताना चौकशी होते तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याउलट ज्या डॉक्टरांनी मुलाचा जीव वाचवला असे डॉ.सुबोध बोरले हे बऱ्हाणपूरवरून मलकापूर येथे कर्तव्यासाठी येतात. मात्र, शहरातल्या शहरातच चौकशी समिती समोर डॉ.राहुल चोपडे हजर नव्हते. विशेष म्हणजे चोपडे यांचे साठे नामक हेर या परिसरात दिसून आले.
डॉ.संतोष पोळ सापडले वादाच्या भोवऱ्यात
पीडित मातेने आरोप केला आहे की, डॉ.चोपडे यांच्याविरुद्ध गठीत समितीतील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.संतोष पोळ यांचे व डॉ.चोपडे यांचे मैत्रीपूर्ण व सलोख्याचे संबंध आहे. शिवाय गेल्या दिवसात डॉ.पोळ यांचा डॉ.चोपडे यांच्याकडे मुक्काम राहिला आहे. त्यामुळे अशा वादग्रस्त डॉक्टरांकडून मला निपक्ष व पारदर्शक न्याय मिळण्याची शक्यता नाही. शिवाय पीडित माता व मुलाला पाहून डॉ.पोळ मिस्कीलपणाने हसत असून खिल्ली उडवित असल्याचाही आरोप मातेने केला आहे. त्याच कारणाने चौकशी समितीला काळे झेंडे दाखवून पीडित मातेने निषेध नोंदविला आहे.