साईमत/ न्यूज नेटवर्क । चाळीसगाव ।
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नव तेजस्विनी प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील ओझर शिवारात रेडिमेड गारमेंट युनिट सुरू केले आहेत. त्यात तालुक्यातील ३० महिलांना स्वयंरोजगार मिळाला आहे. त्याचे नुकतेच शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माविम जळगावचे उपजीविका तज्ज्ञ प्रशांत पाटील, व्यवस्थापक आशिष मोरे, चाळीसगाव कोओर्डीनेटर राजश्री राजपूत, कर्मचारी पंकजा बागुल, रंजना अहिरे आदी उपस्थित होते.
प्रकल्पासाठी शासनाकडून सबसिडी उपलब्ध होती. मात्र, जागा नसल्याने गेली अनेक वर्षे हा प्रकल्प सुरू होत नव्हता. ही बाब आ.मंगेश चव्हाण यांना सांगितल्यावर त्यांनी आपली ओझर येथील लावण्या सिटीमधील खासगी जागा निशुल्क उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज हा प्रकल्प सुरू होऊ शकला असल्याची भावना अभियानाच्या कोओर्डीनेटर राजश्री राजपूत यांनी व्यक्त केली.
युनिटमध्ये ३१ मशीन
रेडिमेड गारमेंट युनिटमध्ये ३१ मशीन आहे. ३० महिला यावर शिलाई करतील. त्यांच्यावर ३ ट्रेनर लक्ष ठेवून असणार आहेत. सद्यस्थितीत शाळेचे गणवेश शिलाई काम सुरू आहे. प्रति नगाप्रमाणे महिलांना मजुरी दिली जात आहे.