जळगावातून डबल टाळ्या घेऊनही मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात ‘तो मी नव्हेच…!’

0
34

 साईमत विशेष प्रतिनिधी (विवेक ठाकरे) | जळगाव :

‘ तो मी नव्हेच…!’ हे आचार्य अत्रे यांचे लोकप्रिय मराठी नाटक बहुतेकांना माहिती आहे. ह्या नाटकामधु्न प्रभाकर पणशीकरांनी एका बदमाशाची भूमिका साकारत अजरामर केली होती. त्यानंतर जेव्हा केव्हा कोणीही आपल्याच वागण्यातून दुरंगीपणा दाखवला त्यावेळी या नाटकाचा दाखला दिला जातो. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी संपूर्ण फी माफिचा निर्णय जळगाव येथे विद्यापीठाच्या कार्यक्रमात जाहीर केला होता. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यावर सुद्धा मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने त्यांना त्यांचीच घोषणा लक्षात राहावी म्हणून स्मरणशक्ती तल्लक ठेवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा अँड.रोहिणीताई खडसे -खेवलकर यांनी बदाम पार्सलने पाठवणार असल्याचे उपहासात्मक जाहीर केले. गेल्या दोन दिवसापासून अँड. रोहिणीताई खडसे यांची ही टीका व वेगळ्या पद्धतीचे आंदोलन राज्यभर चर्चेत आहे.

मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी अँड. रोहिणीताई खडसे यांनी केली होती. यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना स्मरणपत्र आणि स्मरणशक्ती येण्यासाठी सोबत बदाम पाठवून आगळेवेगळे आंदोलन करण्याचा त्यांनी ईशारा दिला होता. या ईशाऱ्यावर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मात्र ‘तो मी नव्हेच…!’ अशी भूमिका घेत रोहिणीताई यांना मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील म्हणायचे होते, असे नमूद करून मुलींच्या शैक्षणिक फी माफिच्या मुद्द्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले.

■ जळगावातून डबल टाळ्या घेतल्याचे मंत्री पाटील विसरले ?

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ९ फेब्रुवारी २०२४ रोजी जळगाव येथे आले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला रात्री 2 वाजता फोन करून उठवले व एका मुलीच्या शैक्षणिक शुल्क न  भरता आल्याने आत्महत्या केल्याची गोष्ट सांगून संपूर्ण फी माफ करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा किस्सा अत्यंत रंगवून सांगितला होता. यावेळी आपण या घोषणेनंतर डबल टाळ्या वाजवाल अशी अपेक्षा उपस्थितांकडून त्यांनी व्यक्त करत टाळ्या मिळवून घेतल्या होत्या. त्यावेळी येत्या जून महिन्यापासून ज्या विद्यार्थिनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थिनींना यापुढे कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नसल्याची त्यांची ती घोषणा होती. यात अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी यासारख्या ८०० अभ्यासक्रमांचा समावेश असेल, असेही पाटील यांनी सांगितले होते. परंतु जून महिना संपायला आला तरीही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे मुलींच्या या मोफत शिक्षणाचा आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे उपस्थित पालकांनी वाजविलेल्या डबल टाळ्या मंत्री चंद्रकांत पाटील विसरल्याची चर्चा आहे.

■ मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात ‘ तो मी नव्हेच…!’

मुलींना संपूर्ण फी माफिच्या घोषणेची आठवण येण्यासाठी अँड.खडसे यांनी बदाम पाठविणार असल्याचे म्हटले असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले तर मंत्र्यांनी ‘तो मी नव्हेच…!’ असे म्हणत रोहिणीताईंना मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील म्हणायचे असेल अशी टिप्पणी करत मुलींच्या फी माफिच्या घोषणेचे काय ? याबाबत बोलणे टाळले.


मुलींच्या शैक्षणिक शुल्क माफीच्या घोषणेचा विषय असल्याने मंत्र्यांचे लक्ष वेधता यावे म्हणून आमच्या स्मरणपत्र व स्मरणशक्ती वाढवण्याच्या बदाम पाठवण्याचा आंदोलनावर पत्रकारांनी छेडले असता मंत्री चंद्रकांतदादा यांनी दिलेल्या उत्तरातून ते उच्च तंत्र शिक्षणमंत्री आहेत, याचाच त्यांना विसर पडल्याचे दिसून येते. त्यामुळे मंत्री असलेल्या दादांना त्यांचे पद, कामाची जबाबदारी आणि केलेल्या घोषणा यासाठी दुप्पट बदाम पाठवावे लागतील.

-अँड.रोहिणीताई खडसे -खेवलकर
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाराष्ट्र


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here