साईमत/ न्यूज नेटवर्क । वरणगाव ।
येथील पोलीस स्टेशन हद्दीतील टहाकळी फाट्यावर बेकायदेशिररित्या गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस खरेदी विक्री करताना आणि कब्जात बाळगतांना मिळून आलेले दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतूस, असा ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोघांवर वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दोघा संशयितांना सोमवारी, २४ जून रोजी न्यायालयात हजर केल्यावर एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील टहाकळी फाट्याजवळ सार्वजनिक जागी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस खरेदी विक्री होत असल्याची गोपनीय माहिती वरणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने रविवारी, २३ जून रोजी रात्री ११.३० वाजता सापळा रचला होता. यावेळी संशयित आरोपी सागर प्रकाश डिके उर्फ सत्या (रा.टहाकळी, ता.भुसावळ), आकाश विष्णू सपकाळे (रा.रायपूर, ता.रावेर) या दोघांची चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आले. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. याप्रकरणी पो.कॉ. योगेश सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जैन करीत आहे.
संशयितांकडून मुद्देमाल जप्त
दोघा संशयितांकडून ३० हजार रुपये किमतीचा एक सिल्व्हर रंगाचा त्यास तपकिरी रंगाची मूठ, मॅक्झिन असलेला गावठी पिस्तूल आणि चार हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस प्रति दोन हजार किमतीचे असा मुद्देमाल जप्त केला आहे.
