ग्राहकांना धान्य वितरणाच्या पावतीसह आवश्‍यक सुविधा मिळाव्यात

0
29

साईमत/ न्यूज नेटवर्क । यावल ।

शहरासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून ग्राहकांना धान्य वितरण करण्याची पावती तथा कॅश मेमो आणि आवश्‍यक सुविधा मिळाव्यात, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (ना. अजित पवार गट) पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ग्राहकांनी यावलच्या तहसिलदारांसह पुरवठा अधिकाऱ्यांना नुकतेच देण्यात आले. लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून होणाऱ्या धान्य वाटप संदर्भात तक्रार निवेदन वजा मोर्चात शिधापत्रिकेवर धान्य मिळविणाऱ्या महिला लाभार्थी ग्राहकही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी तहसिलदारांनी सर्वांच्या तक्रारी ऐकून योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीने राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील, रा.यु.काँ.चे तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, रा.यु.काँ.चे शहराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, सर्व शिधा वाटप क्षेत्रातील अधिकृत शिधा वाटप दुकानात ही पॉस मशीनमधून आलेली रेशनची पावती कार्डधारकाला नियमानुसार मिळावी, रेशन कार्डधारकांनी जमा केलेल्या कागदपत्राची पोहच रेशन कार्डधारकाला मिळण्याची व्यवस्था करावी, ईष्टांक शिल्लक नसल्यास अर्ज नाकारला जातो तसे न करता अर्ज प्रतीक्षा यादीत ठेवावा, नियमानुसार इष्टांक उपलब्ध झाल्यास लाभ देण्यात यावा, नाव कमी करणे, वाढविणे किंवा रेशन संदर्भात सर्वच कुटुंबातील लोकांची वारंवार आधार कार्ड मागणी करण्यात येऊ नये, हमीपत्र सोबत केवळ रेशन कार्डची नक्कल प्रत जोडायची आहे, हमीपत्र दाखल केल्यानंतर ४५ दिवसानंतर कार्यवाही संदर्भात काळधारकास माहिती देण्याची व्यवस्था करावी, दुकानात धान्य आल्याची किंवा धान्य घेतल्यानंतर कार्डधारकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस मेसेज पाठविण्याची व्यवस्था करावी, सर्व प्राप्त कार्डधारकांच्या कार्डवर प्राधान्य किंवा अंतर्गत असा शिक्का व बारा अंकी आरसी नंबर लिहिण्याची मोहीम राबवावी, महिन्यात एक दिवस दुकानात अन्न दिवस साजरा करण्याविषयी शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, सर्व शिधावाटप कार्यालयात नागरिकांची सनद दर्शनी भागात लावण्यात यावी, त्यात कार्यालयाची कामे लागणारा वेळ खर्च आणि काम न झाल्यास तक्रार कुठे करावी लागणार याबद्दल माहिती असावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here