साईमत/ न्यूज नेटवर्क । चाळीसगाव ।
गेल्या २१ जून रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनसमोर शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), काँग्रेस, आप आदी महाविकास आघाडीच्यावतीने धरणे आंदोलन केले होते. त्यात महाविकास आघाडीचे नेते किसनराव जोर्वेकर यांनी आ.मंगेश चव्हाण यांना ‘माझ्या नादी लागशील तर रस्त्यावर पिस्तूल आणून गोळी घालून टाकेल’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे भाजपा महायुती तसेच चाळीसगाव तालुकावासियांतर्फे निषेध म्हणून सोमवारी, २४ जून रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात धमकी देणाऱ्या किसनराव जोर्वेकर यांना अटक करा, त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या माजी खासदार, माजी आमदारांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करुन पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.
आंदोलनात आ.मंगेश चव्हाण यांच्या समर्थकांनी किसनराव जोर्वेकर, माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई आठवले गट आदी महायुतीचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, तरुण, युवक, विद्यार्थी, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न
स्थानिक लोकप्रतिनिधी आ.मंगेश चव्हाण यांना निवडणुकीत पराभूत करणे अशक्य वाटत असल्याने विरोधक महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकाऱ्यांनी मुद्दामहून मतदारांमध्ये भीती व संभ्रम निर्माण करण्यासाठी सुनियोजित पद्धतीने आंदोलन आणि विद्यमान आमदारांना जीवे ठार मारण्याचे वक्तव्य केले गेले आहे. आंदोलन आणि प्रक्षोभक वक्तव्यामुळे दोन गट, समाज, पक्षाच्या कार्यकर्त्यांत तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला गेला आहे.
पोलिसांकडून अद्यापही कारवाई नाही
घटनेला ४८ तास उलटूनही तसेच अगदी पोलीस स्टेशनच्या आवारात एका विद्यमान लोकप्रतिनिधीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊनही पोलीस प्रशासनाने कुठलीही कायदेशीर कारवाई संबंधितांवर केली नाही. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनीही त्याची दखल घेतली नसल्याने स्थानिक प्रशासन घटनेच्या अनुषंगाने उदासीन तसेच कुणाला तरी घाबरून दबावाखाली असल्याचा आरोप करण्यात आला.
कायदेशीर मार्गाने उत्तर देणार : किसनराव जोर्वेकर
आ.मंगेश चव्हाण यांचे नाव घेवून कुठलेही वक्तव्य केले नाही. त्यांना धमकी दिली नाही. प्रसारित होणाऱ्या बातम्या खोट्या असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किसनराव जोर्वेकर यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे आंदोलन झाले. त्याठिकाणी मी माझे विचार मांडले. त्यात मी कुठेही आ.मंगेश चव्हाण यांचे नाव घेवून त्यांना गोळ्या घालण्याची भाषा केली नाही. यासंदर्भात आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत.ज्यांनी याविषयाचे भांडवल करून मला आणि आमदारांना बदनाम करण्याचा आणि राजकीय भांडवल करून आपला कंड क्षमविण्याचा प्रयत्न केला, त्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर देणार असल्याचेही किसनराव जोर्वेकर यांनी सांगितले.