साईमत विशेष प्रतिनिधी
रावेर विधानसभा मतदारसंघातून २००९ आणि २०१९ अशा दोन्हीवेळी विजयश्री खेचून आणणाऱ्या आ.शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत गेल्या महिन्यात राजकीय निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, त्यांच्या पश्चात या परिवाराची चौथी पिढी म्हणून ओळख असणाऱ्या युवा नेते व एन.एस.यु.आय.चे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय चौधरी हे आगामी विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार असतील यावर सुध्दा यानिमित्त शिक्कामोर्तब झाले आहे. रावेर विधानसभेच्या या लढतीत धनंजय चौधरी यांच्यासमोर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, डॉ. कुंदन फेगडे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांच्यासह डॉ.केतकी पाटील यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा आहे. सोबत गतवेळी अपक्ष रिंगणात असलेले भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे यावेळी सुध्दा आपले नशिब अजमावणार आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाकडून त्यांची उमेदवारी निश्चित असून गेल्यावेळी त्यांच्या खात्यावर जमा झालेल्या मतांचा आकडा ते कायम ठेवतात का? याकडे लक्ष राहील.
आ.शिरीषदादा चौधरी यापुढे मतदार संघामध्ये स्वत:ला सामाजिक कार्यात झोकुन देत परिसरात व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमाची शैक्षणिक दालने सुरु करण्याचा मनोदय त्यांनी आपल्या निवृत्तीच्या भूमिकेवेळी बोलुन दाखविला होता. त्याचाच भाग म्हणून रावेर मतदार संघातील पाल या आदिवासी गावामध्ये राहुरी कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन
महाविद्यालय अशी दोन दालने सुरु करण्यासाठी आ.चौधरी यांचे प्रयत्नसुध्दा सुरु झालेले आहेत. दरसाल हजारोच्या संख्येने पदवीधर म्हणून बाहेर पडणाऱ्या बेरोजगार फौजा थांबविण्यासाठी यापुढील जीवन जगणार असल्याची त्यांची समाजाप्रतीची भावना स्व.बाळासाहेब चौधरी यांच्या सेवा व परंपरेचा वारसा ते यथार्थ पुढे नेत असल्याची त्यांच्या या निर्णयातून जाणीव झाली. दरम्यान, रावेर विधानसभा मतदारसंघात कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांचा वारसा घेऊन कार्यरत अमोल जावळे हे प्रबळ दावेदार आहेत. सोबत यावल येथील प्रथितयश स्त्रीरोगतज्ज्ञ व आशय फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. कुंदन फेगडे यांनी सुध्दा भाजपाकडून आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत. फैजपूर येथील माजी नगराध्यक्ष व शिक्षण संस्थांच्या माध्यमातून कार्यरत लेवा पाटील समाजाचे ख्यातनाम पांडुरंग सराफ व भाजपात प्रवेश केलेल्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांच्या नावांची सुध्दा चर्चा आहे. गेल्या वेळी लक्षणीय मते घेऊन चर्चेत राहिलेले अनिलभाऊ चौधरी यांनी गेले पाच वर्ष मतदारसंघात कायम संपर्क ठेवल्याने त्यांच्याविषयी सुध्दा मतदारांमध्ये ओढा दिसून येतो.
आमदारकीसाठी धनंजय चौधरी मैदानात
कोरोना काळात त्यानंतर आ.शिरीषदादा चौधरी यांचेवर गेल्यावर्षी तिसऱ्यांदा झालेल्या हृदय शस्त्रक्रीयेदरम्यान त्यांचे संपुर्ण कामे धनंजय चौधरी यांनी सक्षमरित्या हाताळली. रावेर-यावल तालुक्यातील विकास कामांसाठी शासकीय पाठपुरावा, निधी मिळविण्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा, मुंबई व नागपूर येथील विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये मंत्री, विरोधीपक्ष नेते व अधिकाऱ्यांना भेटून मतदारसंघाचे प्रलंबीत प्र्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेली धडपड ही सर्वश्रृत आहे. विकास कामांच्या सोबतच युवाफळीचे चांगले संघटन निर्माण व्हावे म्हणून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजनात गेल्या तीन वर्षापासून असलेला सहभाग त्यांची जमेची बाजू आहे. तोरणदार व मरणदार अशा प्रत्येक ठिकाणी न चुकता हजेरी लावणे हे सुध्दा धनंजय यांनी काटेकोर पाळत एक सामाजिक बांधिलकी निर्माण केली आहे. स्व.लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी राज्यस्तरावर एक प्रमुख नेते म्हणून आपल्या प्रभावी शैलीने त्यावेळी घेतलेले धोरणात्मक निर्णय, त्यातून राज्याचा साधलेला विकास आणि आपोआपच जिल्ह्यापर्यंत आणि रावेर-यावल तालुक्याच्या विकासाला त्यावेळी मिळालेली गती ही जिल्ह्याच्या विकासात एक अविस्मरणीय वाटचाल आहे. पुढे काही कालखंड वगळता आ.शिरीषदादा चौधरी यांनी मधुकरराव चौधरी यांचा यथार्थ वारसा पुढे नेतांना कसोशिने प्रयत्न केला. त्यात त्यांच्या कार्यकाळामध्ये शेळगाव बॅरेज हा महत्वपूर्ण प्रकल्प मोठी उपलब्धी मानावी लागेल. आता २०२४च्या आगामी चार महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत आपले चिरंजीव धनंजय चौधरी यांना ‘प्राजेक्ट’ करण्याचा जाहीर केलेला निर्णय या भागातील मतदार मनावर घेतात किंवा कसे याकडे सर्वांचे लक्ष आहे.