साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या जे.ई.स्कुलच्या ज्यु.कॉलेजचे १९९३-९४ व १९९४-९५ च्या बॅचचे माजी विद्यार्थ्यांनी व्हाट्सॲप ग्रुपवर ‘गेट-टु गेदरची’ संकल्पना मांडली. त्याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘गेट-टु गेदरची’ संकल्पना प्रत्यक्षात खरी करुन दाखविली. मुक्ताईनगर-मलकापूर हायवेला लागून पद्मश्री लॉन्समध्ये हा ‘गेट-टु गेदर’चा कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाला मुंबई, पनवेल, कल्याण, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, अमरावती, नागपूर, पुणे येथून विद्यार्थी आले होते. २९ वर्षानंतर मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी जे.ई.स्कुलचे प्राचार्य आर.पी.पाटील, उपशिक्षक एस.पी.राठोड, संजय ठाकूर, कल्याण येथून आलेले प्रकाश इंगळे उपस्थित होते.
शाळेप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी व शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या निमखेडी येथील शाळेच्या ग्रंथालयाला उपशिक्षक अनिल चव्हाण यांच्याकडे पुस्तके सुपूर्त केली. कार्यक्रमाला संबोधित करताना प्राचार्य आर.पी.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. तसेच शाळा आणि शिक्षकांबद्दल आजही तुमच्या मनात असलेला आदर आणि ऋणानुबंधाची भावना बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात अशा प्रकारचे गेट-टुगेदरचे कार्यक्रम घेऊन शिक्षक आणि शाळा यांचे विद्यार्थ्यांशी असलेले नाते घट्ट होण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन पुन्हा पुन्हा करावे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. संजय ठाकुर यांनीही मनोगत व्यक्त केले.
सभागृहातील वातावरण झाले भावनिक
शाळेचे आपण माजी विद्यार्थी आहोत. शाळेमुळेच आपण घडलो. शाळेने आपल्यावर संस्कार केले. शिक्षकांनी आपल्याला घडविले. त्यामुळे शाळेप्रती काहीतरी आपण देणे लागतो, या उदात्त भावनेतून कल्याण येथून आलेली माजी विद्यार्थिनी आशा ठाकुर हिनेे विद्यालयाला दोन माईक भेट दिले. याप्रसंगी सभागृहातील वातावरण भावनिक झाले होते. आजही समाजात शाळा आणि शिक्षकांविषयी आदर, मान-सन्मान असल्याचा सूर विद्यार्थ्यांमधून व्यक्त झाला. सुरुवातीला सर्वांनी आपापला परिचय करून दिला.
विद्यार्थ्यांनी लुटला मनमुराद आनंद
विविध खेळ, संगीत खुर्ची, अंताक्षरी यासारख्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. विविध गाण्यांवर डान्स करतांना विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आले होते. विजू खैरनार, आशा ठाकुर यांनी बहारदार गीते सादर करून कार्यक्रमात रंगत भरली होती.
यशस्वीतेसाठी संजय सूर्यवंशी, गजू वंजारी, छोटू भोई, जितु पाटील, भास्कर कोळी, गणेश गलवाडे, अनिल चव्हाण, मनोज ठाकूर, आशा ठाकुर, दुर्गा ठाकुर, मनीषा देशमुख, अनिता कोळी, कल्पना कोळी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन संजय सूर्यवंशी, नितीन भालेराव यांनी केले.
