साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील चोपडे एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी, १४ जून रोजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. जयेश गुजराथी उपस्थित होते. मेळाव्यामुळे माजी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातील जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.
मेळाव्यात मार्गदर्शक डॉ. जयेश गुजराथी यांनी माजी विद्यार्थ्यांना नॅकची संकल्पना समजून सांगितली. नॅक हे महाविद्यालयाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी असले तरी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी अधिक फायदेशीर आहे. विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक हेदेखील महाविद्यालयाच्या गुणवत्तेत मोलाची भूमिका बजावितात, हे लक्षात आणून दिले. म्हणून महाविद्यालयातून शिक्षण घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढविण्यासाठी महाविद्यालयात सहभाग नोंदवावा. नेहमी मार्गदर्शन करावे आणि सल्ला द्यावा, असे आवाहन केले.
माजी विद्यार्थ्यांनी आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. उस्फूर्तपणे सहकार्य करून महाविद्यालयाचा गुणवत्तेचा आलेख कसा वाढेल, यासाठी सदैव प्रयत्न करत राहू, असे माजी विद्यार्थी मेळाव्याचे अध्यक्ष तुषार लोहार यांनी सांगितले.
यावेळी चोपडे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव माधुरी मयूर, आय. क्यू.ए. सी. कमिटीचे सदस्य गोविंद गुजराथी, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तुषार लोहार, उपाध्यक्ष प्रफुल्ल जोशी, खजिनदार रुपेश नेवे, प्राचार्य डॉ. रजनी सोनवणे, माजी प्राचार्य एम. पी. पाटील, समन्वयक प्रा. एन. डी. वाल्हे, प्रा. डॉ. सविता जाधव, माजी विद्यार्थी संघटनेचे विविध ठिकाणावरून आलेले विद्यार्थी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन तथा आभार प्रा. डॉ. सविता जाधव यांनी मानले.