चिमुकलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी

0
26

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या सहा वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची घटना घडली आहे. ह्या गंभीर घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, यासाठी जामनेर तालुका आदिवासी संघटनेतर्फे मोर्चा काढून तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

सुभाष उमाजी भील (वय ३५, रा.चिंचखेडा) या संशयित आरोपीने ११ जून रोजी सायंकाळच्या सुमारास एका सहा वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला बागेत नेऊन तिच्यावर अत्याचार करत तिचा खून केल्याची घटना घडली. २४ तास उलटूनही संशयित आरोपी अद्याप पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे तात्काळ आरोपीला शोधून अटक करावी व त्याच्यावर फास्टट्रॅक खटला कोर्टात चालवून त्याला फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी आदिवासी भील समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला होता.

मोर्चात सुधाकर सोनवणे, आत्माराम ठाकरे, राजू मोरे, भगवान मोरे, दिनेश सोनवणे, संतोष ठाकरे, राजू पवार, सागर गोसावी, रवींद्र ठाकरे, श्रीराम कोळी, श्रावण कोळी यांच्यासह आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते.

घटनेचा तपास पोलीस स्तरावरून सुरु आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि पाचोरा उपविभागीय अधिकारी धनंजय वेरूळे जामनेर येथे आहे. लवकरात लवकर आरोपी शोधून संशयित नराधमाला अटक करण्यात येईल, अशी माहिती पाचोरा उपविभागीय अधिकारी धनंजय वेरूळ यांनी दिली.

पालकमंत्री पीडित कुटुंबाच्या भेटीला

ही घटना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कळताच ते गुरुवारी, १३ जून रोजी पीडित कुटुंबाच्या भेटीला गेले होते. कुटुंबांवर हा खूप मोठा आघात आहे, त्यांना भेटून त्यांचे सांत्वन केले. ह्या गंभीर घटनेतील गुन्हेगार फरार असून तो सापडल्यानंतर त्याच्यावर कायद्यानुसार शिक्षा मिळेल. कुटुंबाच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहे. त्यांना अधिकाधिक सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्‍वासनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here