साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
अंतर्धान समाधी सोहळा साजरा झाल्यावर आईसाहेब मुक्ताईना आलेला थकवा क्षीणभाग घालविण्यासाठी प्रक्षाळ पूजा शुक्रवारी, ७ जून रोजी सकाळी ८ वाजेपासून ते १० वाजेपर्यंत महाआरती व पूजा अभिषेक करून झाली. प्रक्षाळ पूजा संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते पार पडली. याप्रसंगी संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, मूळ मंदिर व्यवस्थापक उध्दव जुनारे महाराज, राम जुनारे, विनायक व्यवहारे, दुर्गा मराठे, कल्पना हरणे, गीता जुनारे, गणेश आढाव यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते.
२५ मे ते ४ जूनपर्यंत संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा उत्साहात साजरा झाला. हजारो भाविकांनी अकरा दिवसात दर्शन घेतले. यात्राकाळात मंदिर २४ तास खुले ठेवण्यात आले होते. भाविकांच्या दर्शनाचे गर्दीने मुक्ताईस आलेला थकवा क्षीणभाग घालविण्याकरिता प्रक्षाळ पूजा करण्याची परंपरा आहे. प्रक्षाळ पूजेचे दोन भाग असतात. उपस्थितांकडून मंदिर गाभारा व परिसर स्वच्छ करतात. विविध औषधी काढे तयार करून अभिषेक केला जातो. यावेळी भाविक मुर्तीला साखरलिंबू लावतात. आरतीनंतर पुरणपोळी नैवेद्य दाखवितात. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने प्रक्षाळ पूजेस उपस्थित राहून मुक्ताई चरणी सेवा रुजू केली.