साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर
येथील बस स्थानकात पहिल्याच पावसात बस स्थानकात पाणी साचले आहे. त्यामुळे डबक्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
पहूर बसस्थानक छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील एक मोठे बस स्थानक आहे. येथे नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने पहूर येथून शिक्षणासाठी ये-जा करतात. सकाळी ४ वाजेपासून रात्री उशीरापर्यंत येथून हजारो प्रवाशांचा येथे राबता असतो. सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पहूरला मान्सूनचे आगमन झाले. पहिल्याच पावसात बसस्थानकात डबकी साचल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. डासांचा प्रादुर्भाव होऊन रोगराई पसरण्याची शक्यता आहे.
लोकवर्गणीतून उभारलेल्या बसस्थानकाला वाली कोण?
ट्रक अपघातात १३ जणांचा बळी गेल्यानंतर पहूरला बसस्थानक निर्मितीसाठी आरोग्यदूत अरविंद देशमुख यांनी उपोषण करत जन आंदोलन छेडून लढा दिला होता. लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॅप्टन दादासाहेब डॉ.एम.आर. लेले बसस्थानकाची उभारणी करण्यात आली. दरम्यानच्या काळात मात्र बस स्थानकातील लोखंडी बाक तुटले आहे. सध्या बसस्थानकाकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधितांनी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. पहूर येथील बस स्थानक स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीने सहकार्य करावे, स्वच्छतेसंबंधी माहिती पत्रव्यवहार करून प्रशासनाला कळवितो, असे जामनेरचे आगार प्रमुख जे.डी.वाघ यांनी सांगितले.