साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील जैन गल्लीच्या भागातील दोन ते तीन नळ कनेक्शनला वेगाने पाणी न आल्याच्या मुद्द्यावरून पूर्ण गावात पाणीटंचाई असून नवीन पाईप लाईन फेल असल्याचा खोटा आरोप करून उबाठा गटाने आपल्या बौद्धिक टंचाईचे दर्शन घडवित पालिकेत गोंधळ घातल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे. यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाने प्रसिद्धी पत्रक काढले आहे.
त्यात म्हटले आहे की, संपूर्ण शहरात नवीन पाईप लाईनचे काम पूर्ण झालेले आहे. शहरात पाणी वितरणाचे चार झोन तयार केले आहे. सर्व चार झोनमध्ये साधारण ५ हजाराहून अधिक कनेक्शन देण्यात आले आहे. चौथ्या झोनमधील साधारण ३५ ते ४० टक्क्याची कमिशिंग अर्थात पाणी वितरणची टेस्टिंग अपूर्ण आहे. पुढील १५ ते २० दिवसात ते काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर संपूर्ण गावात सुरळीत पाणी सुरु झालेला असेल. बुधवारी जैन गल्ली परिसरात दोन ते तीन नळ कनेक्शनला वेगाने पाणी न आल्याच्या मुद्द्यावरून पूर्ण गावात पाणीटंचाई आहे. नवीन पाईप लाईन फेल असल्याचा खोटा आरोप करून उबाठा गटाने पालिकेत गोंधळ घातला.
वास्तविक पाहता जैन गल्ली परिसरात पहिल्यांदा पाणी वितरणची टेस्टिंग करण्यात आली. या टेस्टिंगनंतरच कोणत्या कनेक्शन धारकाला पाणी मिळतेय, कुणाला मिळत नाही आणि कुणाला कमी मिळतेय, हे समजून येत असते. त्यामुळे पुढील वेळेस पाणी फोर्समध्ये येण्याची तांत्रिक अडचण सोडविण्यात येणार होती. परंतू फक्त विरोधाला म्हणून विरोध म्हणून उबाठा गटाने आंदोलनाच्या नावाखाली पालिकेत गोंधळ घातला. वास्तविक पाहता पाईप लाईनचे काम अर्थात पाणी पुरवठ्याच्या कामात मुद्दाम कोण अडथळे आणताय, हे संपूर्ण गावाला माहिती आहे. योग्य वेळ आल्यावर विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. कारण विरोधक पाणी पुरवठ्याच्या कामात मुद्दाम अडथळे आणून धरणगावकरांना वेठीस धरताय, हे आम्ही होऊ देणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धी पत्रकावर माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, पप्पू भावे, वासुदेव चौधरी, विजय महाजन, विलास महाजन, माजी नगरसेवक सुरेश महाजन, पवन महाजन, बालू जाधव, सद्दाम शहा, हेमू चौधरी, रवी महाजन, बुट्या पाटील, अहमद पठाण, विनायक महाजन, संतोष महाजन, भरत महाजन, अभिजीत पाटील, वाल्मीक पाटील सोनू महाजन, तोसीब पटेल यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
काय आहे शहरातील पाणी वितरणाची स्थिती…!
शहरात पाच हजारहून अधिक नळ कनेक्शन देण्यात आली आहेत. अवघी १०० ते २०० कनेक्शन देण्याचे बाकी आहेत. पाणी वितरण व्यवस्थेसाठी चार झोन तयार केले आहे. पहिल्या झोनची पाण्याची टाकी ९ लाख लिटर, दुसऱ्या झोनची ४.८० लाख लिटर तर चौथ्या झोनची ९ लाख लिटरची पाण्याची टाकी आजच्या घडीला सुरु आहे. तीन झोन पूर्ण असून चौथ्या झोनमधील साधारण ३५ ते ४० टक्क्याची कमिशिंग अर्थात पाणी वितरणची टेस्टिंग अपूर्ण आहे. चौथ्या झोनमधील मोठा माळी वाडा, पाताल नगरी, कुरेशी मोहल्ला, खत्री गल्लीसह इतर काही भाग अपूर्ण आहे. पुढील १५ ते २० दिवसात या भागात कमिशिंग अर्थात पाणी वितरणची टेस्टिंग पूर्ण होणार आहे.