साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथील मूळ मंदिर जुनी कोथळी मंदिरात आदिशक्ती श्री संत मुक्ताईचा ७२७ वा अंतर्धान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवारी, ३ जून रोजी भागवत एकादशीच्या दिवशी मुक्ताईनगर, कोथळी, मेहूण येथील श्री संत मुक्ताई मंदिरात हजारो भाविकांनी मुक्ताईच्या दर्शनाचा लाभ घेतला, असे मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, ह.भ.प. उद्धव जुनारे महाराज, ह.भ.प. विनायक हरणे, ज्ञानेश्वर हरणे यांनी सांगितले.
सोहळ्यासाठी पंढरपूरहुन आलेले पंढरीश परमात्मा विठ्ठल पादुका सोहळा पालखी सोहळ्याचे प्रमुख मेघराज वळके पाटील यांनी सोमवारी, ३ जून रोजी भागवत एकादशीच्या मुहूर्तावर पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या पादुकांचा पूजा अभिषेक केल्यानंतर आदिशक्ती मुक्ताईच्या जुन्या मंदिरात आदिशक्ती मुक्ताईला चंदन, उटी, लेप पूजा करताना एक वेगळे स्वरूप दिले. साक्षात तुळजापूर जगदंबा मातेच्या स्वरूपात मुक्ताईची तयारी केली. नवीन मुक्ताई मंदिरात आई साहेबांची चंदन उटी सेवा करताना आदिशक्ती मुक्ताईना चक्क महालक्ष्मी मातेचे स्वरूप दिले. दिवसभरात हजारो भाविकांनी आदिशक्ती मुक्ताईचे या स्वरूपात दर्शन घेतले.