एरंडोलला नदी, नाले सफाई होणार कधी?

0
31

साईमत, एरंडोल : प्रतिनिधी

पावसाळा तोंडावर आला तरी एरंडोलला नदी-नाले सफाई झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. जळगावसह राज्यात सर्वत्र नदी-नाले सफाई सुरू आहे. एरंडोलला का नाही? प्रशासक तथा मुख्याधिकारी बदली होवून चार महिन्यांचा कालावधी उलटला तरी पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे न.पा.चा कारभार ‘रामभरोसे’ सुरू आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. परंतु प्रशासकाअभावी नागरिकांना, प्रशासनाला काय त्रास सहन करावा लागतो त्याचा विचार करणार कोण? नगरपालिकेत अथवा तहसीलदार कार्यालयात कोणत्याही कामासाठी नागरिक गेल्यावर लोकसभा निवडणुकीचे निमित्त सांगून नागरिकांची वाट लावली जाते.आता मतदान १३ मे रोजी संपले असले तरी ४ जून मतमोजणीचे निमित्त सांगितले जाते, यास म्हणावे तरी काय? असाही सूर जनतेतून उमटू लागला आहे.

एरंडोलच्या प्रांताधिकाऱ्यांनी न.पा. अधिकारी आणि अंजनी प्रकल्प अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी नदी स्वच्छ करण्याचे आदेश देवून ‘जैसे थे’ परिस्थिती असते यास म्हणावे तरी काय? अंजनी नदीतील गाळ, काटेरी झुडूपे, प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अचानक अतिवृष्टी झाल्यास होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्‍न जनतेतून उपस्थित होत आहे. त्यामुळे नाले सफाई त्वरित व्हावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here