पंचपरिवर्तनयुक्त भारताची उभारणी करण्याची गरज

0
22

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संतुलन, सामाजिक समरसता, स्व आधारित व्यवस्था निर्मिती आणि नागरिक शिष्टाचार व कर्तव्याचे पालन यातून आपणा सर्वांना पंचपरिवर्तनयुक्त भारताची उभारणी करणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे यांनी केले. चिखली येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत ‘संघ शिक्षा वर्ग (सामान्य)’च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. १ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित संघ शिक्षा वर्गाच्या समारोप समारोहाला मंचावर प. पू. परमहंस परिव्राजकाचार्य श्री श्री १००८ स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज, वर्गाचे सर्वाधिकारी राजेश लोया, तालुका संघचालक शरद भाला उपस्थित होते.

श्रीधरराव गाडगे पुढे म्हणाले, कुटुंबातील संस्कारक्षम वातावरणाला तडे जात आहे. संवादहिनता वाढत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी कुटुंब प्रबोधन मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजे. जाती आधारित विषमता नाहीशी करण्यासाठी सामाजिक समरसता प्रत्येकाला आचरणात आणावी लागेल. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी स्वदेशी व स्वावलंबनाचा भाव समाजात जागवावा लागेल. हिंदुत्वाचा अर्थ सर्वांमध्ये असलेली मूल्ये, संस्कृती, विचार आणि देशाप्रती असलेली निष्ठा हा आहे. संघ हिंदुत्वाचा विचार आचरणातून पसरविण्याचे काम करीत आहे, असे त्यांनी नमूद केले.

संघाच्या शताब्दीकडील वाटचालीचा संदर्भ देत ते म्हणाले की, संघाने आपल्या आजवरच्या वाटचालीत अनेक चढउतार पाहिले. त्यातून अनुभव प्राप्त झाला. अनेक अडचणींवर मात करीत संघ मार्गक्रमण करीत पुढे चालत राहिला. विषाक्त वातावरणातून बाहेर निघाला. संघामुळे अनेक कार्यकर्ते घडले. आपले राष्ट्र मोठे करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सतत प्रयत्नशील आहे. पण हे कार्य केवळ संघानेच नाही तर संपूर्ण समाजाने ते केले पाहिजे. २०२५ हे संघाचे शताब्दी वर्ष आहे. या पृष्ठभूमीवर समाज माध्यमांद्वारे संभ्रम पसरविणाऱ्या दुर्जनांविरुद्ध सज्जनशक्ती उभी राहिली पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञान हे मानवाने निर्माण केले असून तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

संघ राष्ट्रभक्त निर्माण करणारे व्यासपीठ

राष्ट्राच्या प्रती समर्पण, त्याग व प्रेम हे भाव संघ स्वयंसेवकांमध्ये असतातच. या प्रशिक्षण वर्गातून स्वयंसेवकाला प्रेरणा मिळते. येथे जी शिकवणूक मिळाली तिचा सुगंध स्वयंसेवकांनी आपल्या परिसरातील लोकांना आणि मित्रमंडळींना द्यावा. संघ राष्ट्रभक्त निर्माण करणारे विद्यापीठ असून स्वयंसेवक राष्ट्र जोडण्याचे काम करीत असल्याचे स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज म्हणाले.

यावेळी प्रशिक्षण वर्गातील स्वयंसेवकांनी दंड, नियुद्ध, सामूहिक समता, आसने, घोष, व्यायाम योग आदींची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी चिखली शहरासह परिसरातून आलेले स्वयंसेवक तसेच नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक वर्गाचे सर्वाधिकारी राजेश लोया, परिचय तथा आभार प्रांत सहकार्यवाह अजय नवघरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here