पहुरला पाणीटंचाईच्या तीव्र ‘झळा’ वाढल्या

0
76

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर

गोगडी प्रकल्पातून होणाऱ्या अवैध पाणी उपशामुळे गावावर पाणीटंचाईचे संकट आले आहे. त्यामुळे टंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. हे संकट निवारण्यासाठी दोन विहिरींच्या अधिग्रहणासह टँकरच्या मागणीचा एकमुखी ठराव पहूरपेठ, सांगवी, खर्चाणे ग्रुप ग्रामपंचायतीने ग्रामसभेत मंजूर करून टंचाई शाखेकडे पाठविला आहे. जामनेर तालुक्यात आजमितीला १० गावे टंचाईग्रस्त आहे. १९ गावांच्या विहिरी अधिग्रहित केल्याची माहिती टंचाई शाखेने दिली.

गेल्या पाच वर्षांपासून मोतीआई धरणातून पहूरला होणारा पाणीपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे गोगडी प्रकल्पावर पहूरची मदार आहे. पहूर पेठ अंतर्गत खंडेराव नगर आणि ख्वाजानगर भागात पिंपळगाव कमानी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. गोगडी प्रकल्पाने तळ गाठल्याने पाणीटंचाईचे उभे राहिलेले संकट निवारण्यासाठी पहूर पेठ ग्रामपंचायतीने घेतलेल्या ग्रामसभेत दोन विहिरीच्या अधिग्रहणासह टँकरची मागणी करण्यात आली. पाणी पुरवठ्याच्या नळात शंकू अडकत असल्याने पुरेसा पुरवठा होत नसल्याची तक्रार सुषमा चव्हाण यांनी केली. याप्रसंगी सरपंच तथा ग्रामसभेचे अध्यक्ष अब्बू तडवी, उपसरपंच शरद पांढरे, माजी सरपंच प्रदीप लोढा, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजधर पांढरे, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, ग्रामविकास अधिकारी पी. पी. केदार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

धरण ‘उशाला’ कोरड ‘घशाला’

पहूर पेठ, पहूर कसबे, सांगवी या तीन गावांची तहान भागविण्याची क्षमता असलेल्या गोगडी प्रकल्पातून शेतकरी आपल्या शेतातील पिके वाचविण्यासाठी वीज पंपाद्वारे अवैधरित्या हजारो लिटरचा उपसा करतात. टंचाई सदृश्‍य काळात पाणी पिण्यासाठी प्राधान्याने आवश्‍यक असल्याने ग्रामपंचायतींनी अगदी शेवटच्या टप्प्यात मोटारी काढण्याची मागणी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन फेब्रुवारी अखेर पुरेशा वेळेपूर्वीच दूरदृष्टी ठेवून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्‍यक आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी शेती पिकविण्याचे कार्य करतात. प्रचंड उष्णतेने लहान लहान रोपे कोमेजून जात आहेत. अशातच रोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना अवैधरित्या पाणी उपसा करावा लागत आहे. त्याच सूचना वेळेपूर्वी मिळाल्या तर शेतकरी त्या दिशेने विचार करून पीक पेरणी करतील, असे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यासाठी ग्रामपंचायतींनी पाणीटंचाई निवारण वार्षिक आराखडा तयार करणे व तो संबंधितांपर्यंत जाहीर करणे आवश्‍यक आहे. अन्यथा, धरण ‘उशाला’ कोरड ‘घशाला’ अशीच परिस्थिती कायम राहील.

ल.पा.चे सहकार्य

पाणीटंचाई निवारणार्थ पहूर कसबेच्या सरपंच आशा, उपसरपंच राजू जाधव, ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे, ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांनी निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर, लघु पाटबंधारे जामनेर उपविभागाचे अभियंता शुभम पाटील यांच्याकडे अवैध पंप काढण्यासाठी मागणी केली. दोनवेळा अभियंता शुभम पाटील यांनी अवैध वीज पंपांची प्रकल्पावर येऊन पाहणी केली. पाहणी करत असताना काही शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे यांनाच धारेवर धरून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, धरणावरून पाणी उपसा सुरू असल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अभियंता शुभम पाटील यांना सांगितले.

धरण झाले गाळयुक्त

गोगडी प्रकल्प सध्या गाळयुक्त झाला असल्यामुळे अपेक्षित पाणी साठण्यास मर्यादा येत आहे. धरण क्षेत्रातील मुरूम काढला तर पाणीसाठा वाढेल. दिवसेंदिवस धरण उथळ होत असल्याने धरणातील गाळ काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

ॲक्वा पाण्याचा उद्योग तेजीत

पहूर कसबे, पेठ, सांगवी गावात पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर पिण्यासाठी ॲक्वा जारची मागणी वाढली आहे. दररोज हजारो लिटर पाण्याची विक्री होत आहे. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम आणि घरगुती वापरासाठी मागणी वाढल्याने सध्या ॲक्वा उद्योग तेजीत आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here