साईमत, जामनेर : प्रतिनिधी
आगामी होणारी विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (पक्ष शरद पवार) पार्टीतर्फे पक्षादेश झाल्यास लढविणार असल्याची घोषणा तालुक्यातील मूळचे कोदोली गावाचे रहिवासी ह.मु.जामनेर स्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान जुने कार्यकर्ते व्ही. पी. पाटील यांनी शनिवारी, १ जून रोजी जामनेर शहरातील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनेक दिग्गज नेते इच्छुक असले तरी मी पक्षाकडे जुना कार्यकर्ता म्हणून उमेदवारी मागणार आहे. जामनेर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटालाच ही जागा सुटावी, म्हणून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मला उमेदवारी न मिळाल्यास मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहून राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मी १९८५ पासून राजकीय क्षेत्रात काम करीत आहे. सुरुवातीला मी भाजपचा तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळेस जामनेर पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. १९९०-९५ च्या दशकात मीच भाजपचा जामनेर विधानसभेचा प्रमुख दावेदार होतो. मात्र, त्यावेळेस मला उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे मी शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या सोबत गेलो. ते आजपर्यंत कायम त्यांच्यासोबत राहून पक्षांचे एक निष्ठेने काम करीत आहे. त्यामुळे मलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दिले जाईल, यात शंका नाही.
तालुक्याला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी प्रयत्नशिल
मी आजपर्यंत पक्षाने दिलेल्या उमेदवारांसाठी सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये प्रामाणिकपणेे काम केले आहे. ते सुद्धा मला विधानसभेची उमेदवारी मिळाल्यास माझ्यासाठी काम करतील. याबाबत मला कुठलीही शंका नाही. मी आमदार म्हणून निवडून आल्यास राज्यात नव्हे तर देशात एक आदर्श आमदार म्हणून माझी ओळख निर्माण करेल. कारण मी एक स्वच्छ व्हिजन आखले आहे. भ्रष्टाचार मुक्त तालुका, महाराष्ट्र आणि देश घडावा, यासाठी प्रयत्नशील असणार असल्याची माहितीही व्ही.पी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.