साईमत, जळगाव : प्रतिनिधी
पिंप्राळ्यातील सोनी नगर, प्रल्हादनगर भागांमध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. वेळोवेळी मागणी करूनही यावर मनपा दुर्लक्ष करीत असल्याने २७ रोजी मनसेचे पदाधिकारी, नागरिकांनी महानगरपालिकेवर धडक देवून आयुक्त पल्लवी भागवत यांना समस्यांविषयी निवेदन दिले. येत्या आठ दिवसात जनतेच्या समस्या सोडविण्यात याव्या, अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेचे महानगराध्यक्ष आशिष सपकाळे यांनी दिला. निवेदनात प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
प्रल्हाद नगरमध्ये अद्यापपर्यंत अमृत योजनेची पाईपलाईन नसुन पाईपलाईन टाकुन मिळावी, सोनी नगरातील विद्युत खांबावर पथदिव्यांसाठी फेजतार टाकुन मिळावे, नवीन विद्युत खांबावर पथदिवे लावून मिळावे, मनपाकडे साहित्य उपलब्ध असुनही पथदिवे लावण्यास टाळाटाळ का केले जाते. सावखेडा रोड ते सोनी नगर रात्री अंधार असल्याने ओकार पार्क, श्रीराम नगर, गणपती नगरकडे महिलांना पायी जातांना जीव धोक्यात घालुन पायदळ जावे लागते. त्यामुळे दारू अड्डयाजवळचा सावखेडा मेन रस्त्यावरील विद्युत खांबावर नवीन पथदिवे लावण्यात यावे, सोनी नगरातील पथदिव्यांचा विजेचा कनेक्शन गणपती नगरमधील एका विद्युत पोलवर दिला आहे. तो सोनी नगरातच देण्यात यावा, रोज रात्री ९ वाजता पथदिवे बंद होतात. त्यामुळे सोनी नगरात अंधार असल्याने भुरटे चोर फायदा घेतात. दोन तीन सायकल चोरीच्या घटना घडल्या आहेत. प्रल्हाद नगरातील विद्युत खांबावर पथदिवे आहेत. पण ते गेल्या महिन्याभरापासून बंद असून सुरू करण्यात यावे. तसेच अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही, असेही निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन देतांना मनसेचे महानगराध्यक्ष आशिष सपकाळे, श्रीकृष्ण मेंगडे, सोनी नगरातील नरेश बागडे, हेमराज गोयर, विजय चव्हाण, दिनेश जाधव, प्रल्हाद नगरातील दीपक सोनार, जितेंद्र पिंगळे, अपर्णा निकम, दीपीका पिंगळे, अंजली बडगुजर संगिता सोनवणे, विशाल वाल्हे, दिनकर बडगुजर, दामोदर आडेकर, अशोक पाटील, राजेंद्र बडगूजर, राजेश राजपूत, उदय राजपूत, सोनी नगर, प्रल्हाद नगर, गणपती नगर येथील नागरिक उपस्थित होते.